Also visit www.atgnews.com
पुणे शहरातील शाळा बंदच राहणार; ग्रामीण भागात शाळा सुरू होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची हद्द वगळता ग्रामीण भागातील शाळा उद्या २३ नोव्हेंबर सोमवारपासून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून सुरू होणार आहे, अशी माहिती परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी शनिवारी दिली. ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागातील किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतील, याबाबत तज्ज्ञांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे. देशात आणि राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने, शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू होणार की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, पुणे महापालिका क्षेत्रातील पालकांचा शाळा सुरू करण्याला वाढता विरोध लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या कमी असून, प्रसार कमी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व खासगी आणि अनुदानित शाळा सुरक्षित अंतराचे नियम पाळून सुरू होणार आहे. याबाबत डॉ. मोरे म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा उद्या २३ नोव्हेंबर सोमवारपासून सुरू करण्यात येतील. या शाळा सुरू करण्यासाठी; तसेच सुरक्षित अंतराचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल. त्यासाठी आवश्यक तो निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येईल, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा तूर्त बंदच पुणे शहरातील शाळादेखील मुंबई, ठाणे जिल्ह्यांप्रमाणे तूर्त बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. येत्या १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. १३ डिसेंबरला करोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पुण्यातील महापालिका आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळा बंदच राहणार आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरु राहील. 'पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. त्यादृष्टीने सर्व तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र, करोना रुग्णांची देशातील वाढती संख्या, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शासनाच्या हमीपत्राला मिळालेला अल्पप्रतिसाद या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तूर्त १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. संबंधित सर्व अधिकारी, महापालिका आयुक्तांशी याबाबत चर्चादेखील झाली. सध्या ऑनलाइन शिक्षणच सुरु राहावे अशी पालकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,' असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. .... तर पुन्हा शाळा बंद राज्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करणयाची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित अंतराचे नियम पाळून शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये मुख्याध्यापकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. विज्ञान, गणित, इंग्रजी अशा विषयांचे प्रामुख्याने तासिका होतील. त्यामुळे सध्यातरी शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही अडचण नाही. शाळा सुरू झाल्यावर करोनाचा प्रादुर्भाव वाढेल की नाही, याबाबत कोणालाच सांगता येणार नाही. मात्र, एखाद्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास, तेथील शाळा काही काळासाठी बंदही करता येतील, असे माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nHjbhi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments