पुण्यातील शाळा उघडणार की नाही? निर्णय कधी...वाचा

म. टा. प्रतिनिधी, 'राज्य सरकारच्या आदेशांनुसार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी करोनाच्या संभाव्य लाटेची परिस्थिती पाहून येत्या दोन दिवसांत शाळा सुरू करायच्या की नाही, याचा फेरनिर्णय घेऊ,' अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर महापालिकेनेही त्याबाबतचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ म्हणाले, 'मुंबई, ठाणे महानगरपालिकांनी शाळा बंदच ठेवण्याचे निर्णय घेतले आहेत. या दोन्ही महानगरपालिकांनी करोनाची संभाव्य लाट गृहीत धरून तसे निर्णय घेतले आहेत. यापूर्वीचा करोनाचा कहर पाहता मुंबई आणि ठाण्यात पुण्याच्या तुलनेत एक महिना आधी करोनाचा संसर्ग अधिक असल्याचे दिसले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत शाळा सुरू करायच्या की नाहीत, याचा निर्णय घेऊ.' महापालिकेच्या नववी ते बारावीपर्यंतच्या १३ शाळा असून या ठिकाणी आठ हजार ६३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझेशन आणि हात धुण्यासाठीची यंत्रणा प्रत्येक शाळेत निर्माण करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36ZH2SR
via IFTTT

Post a Comment

0 Comments