'१० वी १२ वीच्या परीक्षा, अभ्यासक्रमाबाबत राज्यात गोंधळ'

SSC HSC Syllabus: राज्यात दहावी व १२ वीच्या परीक्षांच्या तारखा कधी घोषित होतील व अभ्यासक्रम किती असेल याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित धोरण ठरविले जात नसून हा संभ्रम दूर करावा अशी मागणी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजक डॉ कल्पना पांडे यांच्या नेतृत्ववाखाली अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापि १० वी व १२ वीच्या परीक्षा कधी घेणार ? अभ्यासक्रम किती असणार तसेच पेपर पॅटर्न कसे असणार याविषयी विद्यार्थी व शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२ वी ला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होतात. हे सर्व विद्यार्थी ९ वी पासून नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करीत आहेत त्यामुळे अभ्यासक्रम कमी करावा मात्र पॅटर्न बदलवू नये अशीही मागणी शिक्षकांकडून होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू असल्यातरी विद्यार्थी कमी उपस्थित आहे तर मुंबई विभागात अजूनही शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन वर्गाला पण अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कृपया दहावी व बारावीच्या परीक्षा कधी घेणार ? अभ्यासक्रम किती असेल याबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यातील ३२ लाखाहून अधिक पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा असे भाजपा कोकण विभाग संयोजक एन एम भामरे व मुंबई विभाग संयोजक राजू बंडगर, जिल्हा अध्यक्ष सचिन पांडे, राजेश मोरे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38zX06N
via IFTTT

Post a Comment

0 Comments