शाळांची घंटा वाजणार; पुण्यातील शाळा ४ जानेवारीपासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका आणि खासगी अखेरीस चार जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची लेखी संमती घेण्याचे बंधन शाळा प्रमुखांना घालण्यात आले आहे. पालकांनी दिलेली लेखी संमती माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण पर्यवेक्षकांना पाठविण्यात यावी, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आदेशांत नमूद केले आहे. मार्च महिन्यांत लॉकडाउनचा निर्णय जाहीर झाल्यापासून बंद झालेल्या शाळा नवीन वर्षातच उघडणार आहेत. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई महापालिकेने शाळा लगेचच उघडण्यास दिलेला नकार, तसेच पालकांचाही फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दोन वेळा शाळा सुरू करण्यास मुदतवाढ दिली होती. अखेरीस, या शाळा चार जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळा प्रशासनास पुरेसा कालावधी मिळावा म्हणून हा निर्णय दहा दिवस आधी जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा दुसरी लाट, ब्रिटनमधील नवीन करोना विषाणू, या पार्श्वभूमीवर पालकांकडून किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याबाबत प्रशासनालाही शंका आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू करायच्या की नाहीत, यावर जोरदार चर्चा झडली होती. करोनाची संभाव्य दुसरी लाट आणि मुंबई, ठाणे महानगरपालिकांनी तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतही शाळा बंद ठेवण्याकडेच कल दिसत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही महानगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील खासगी आणि महापालिकांच्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शाळा १४ डिसेंबरला सुरू करायच्या की नाहीत, याचा निर्णय होणे अपेक्षित होते. पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या शाळा पुन्हा तीन जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. आता अखेरीस या शाळा चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली - एका बाकावर एकच विद्यार्थी - सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक. - शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण आवश्यक. साबण, पाण्याची उपलब्धता बंधनकारक. - शाळेत थर्मल गन, थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर आवश्यक. - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोव्हिड चाचणी बंधनकारक. - चाचणीचा अहवाल वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा. - विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्याची गरज. महाविद्यालये कधी सुरू होणार? एकीकडे शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली असताना महाविद्यालये कधी सुरू होणार, याबाबतचा संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. व्यावसायिक व अन्य अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. तर, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी मात्र गेली अनेक महिने घरीच आहेत. महाविद्यालये बंद असल्याने त्यांचे शिक्षण विस्कळित झाले आहे. आता शाळा सुरू करण्यात येत असताना महाविद्यालयांबाबतही सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aGn4Qf
via IFTTT

Post a Comment

0 Comments