Also visit www.atgnews.com
'त्या' अनाथ गुणवंताला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केवळ अनवधानाने झालेल्या एका तांत्रिक चुकीमुळे आयआयटी मुंबई या देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेतील प्रवेश हुकल्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागलेल्या सिद्धांत बत्रा (१८) या अनाथ व अत्यंत गुणवंत विद्यार्थ्याला अखेर बुधवारी मोठा दिलासा मिळाला. या विशिष्ट प्रकरणात केवळ अपवाद म्हणून दिलेला आमचा हा आदेश पायंडा नसेल, असे स्पष्ट करून न्या. संजय किशन कौल, न्या. दिनेश महेश्वरी व न्या. हृषिकेश रॉय यांच्या पीठाने सिद्धांतचा आयआयटीमधील प्रवेश कायम केला. यापूर्वी पीठाने सिद्धांतच्या अपिलात ९ डिसेंबर रोजी अंतरिम आदेश देताना तूर्तास सिद्धांतला 'इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग'च्या चार वर्षांच्या बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश देऊन अभ्यास करू द्यावा, असे निर्देश आयआयटी मुंबईला दिले होते. तसेच आयआयटी मुंबईला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 'एखाद्याची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन प्रवेशही निश्चित झाला असेल, तर तो आपला प्रवेश रद्द का करून घेईल? आपल्याला प्रवेशाची जागा मिळालेली असल्याने पुढच्या प्रक्रियेत सहभागी न होण्याबाबत पर्याय निवडायचा आहे, अशा गैरसमजातून सिद्धांतने तो पर्याय निवडला, हे दिसत आहे. त्याची ही चूक अनवधानाने झालेली आहे. मग शिक्षण संस्थेने अशा गुणवंत विद्यार्थ्याची तांत्रिक चूक समजून घ्यायला नको का?', असा प्रश्नही पीठाने त्यावेळी उपस्थित केला होता. 'सिद्धांतने अनवधानाने चूक केली होती. त्यामुळे आयआयटी मुंबईने या अपिलाकडे नकारात्मकदृष्ट्या पाहू नये', असे म्हणणे मांडत अॅड. प्रल्हाद परांजपे यांनी सिद्धांतला दिलासा देण्याची विनंती बुधवारच्या सुनावणीत पीठाला केली. तर 'न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संस्थेने सिद्धांतचा प्रवेश कायम ठेवून नियमित केला, तरी या प्रकरणाचा पायंडा पडू नये', अशा आशयाचे म्हणणे संस्थेच्या वकिलांनी मांडले. त्यानंतर पीठाने या प्रकरणातील विशिष्ट आदेश हा पायंडा समजला जाऊ नये, असे स्पष्ट करत सिद्धांतचा प्रवेश कायम करण्याचा आदेश देऊन त्याचे अपिल निकाली काढले. तांत्रिक चुकीमुळे हुकला होता प्रवेश जन्मत:च वडिलांचे छत्र नाही आणि दोन वर्षांपूर्वी आईचेही निधन झाल्याने अनाथ झालेल्या तसेच वयोवृद्ध आजी-आजोबांच्या छत्रछायेखाली वाढत असलेल्या सिद्धांतने अविश्रांत मेहनत घेऊन आयआयटी मुंबईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली होती. 'जेईई अॅडव्हान्स्ड'सारख्या अत्यंत कठीण चाचणीत सहभागी होऊन तब्बल नऊ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांमधून त्याने देशभरातून २७०वा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे अनवधानाने झालेल्या केवळ एका तांत्रिक चुकीमुळे त्याचा आयआयटी मुंबईमधील प्रवेश हुकला असल्याचे पाहून हा विषय सर्वोच्च न्यायालयानेही गांभीर्याने घेतला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s7ubHI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments