Also visit www.atgnews.com
शाळा शुल्कासाठी अडवणूक सुरूच; दहावी-बारावी अर्ज भरताना पालकांसमोर अडचणी
म. टा. विशेष प्रतिनिधी पवई : लॉकडाउनच्या काळात अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. तर अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. यामुळे काही जणांना आपल्या पाल्याच्या शाळांचे शुल्क भरता आले नाही. असे शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावी व बारावीचे अर्ज भरण्यास आडकाठी आणली जात असल्याचे समोर येत आहे. करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शहरातील अनेकांनी रोजगार गमावला. याचदरम्यान शाळांचे वर्ग ऑनलाइन भरू लागले. सुरुवातीचे दोन महिने उलटल्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क मागण्यास सुरुवात केली. शाळा बंद असल्यामुळे अनेक सुविधांचा वापर होत नाही. यामुळे शाळांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी अनेक पालक करीत होते. याबाबत शाळा आणि पालकांमध्ये अनेक वाद झाले. हा वाद न्यायालयातही पोहोचला. यानंतर काही शाळांनी शुल्क कपात करून वेतन कमी झालेल्या पालकांना दिलासा दिला. मात्र काही शाळांनी शुल्क न भरलेल्या पाल्यांची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पवई येथील एस. एम. शेट्टी हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील असाच एक प्रकार समोर आला आहे. शेट्टी हायस्कूलने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास दिले नव्हते. प्रथम शुल्क भरा, नंतर परीक्षा अर्ज भरा, असे सांगण्यात आल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. तसेच अशा प्रकारे भूमिका घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची विनंती केल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले. उत्पन्न प्रमाणपत्राचा आग्रह शेट्टी हायस्कूलशी संपर्क साधला असता, 'ज्या पालकांना शुल्क भरणे शक्य नाही, अशा पालकांनी आपले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे. त्यानुसार त्यांना शुल्क माफी देण्यात येणार आहे. शाळेने शुल्क कपात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, अशा विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचे अर्ज भरण्यास आडकाठी केलेली नाही. याबाबत आम्ही पालकांशी संवाद साधला आहे', असे शाळेचे विश्वस्त महेश शेट्टी यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2K1AtaH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments