सक्षम शालेय शिक्षणासाठी 'स्टार्स'; पाच वर्षांत ९०० कोटींची गुंतवणूक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे जागतिक बँकेच्या सहाय्याने पुढील पाच वर्षांसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 'स्टार्स' या उपक्रमांतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'स्ट्रेंदनिंग टीचिंग-लर्निंग अॅण्ड रिझल्ट्स ऑफ स्टेटस' (स्टार) या उपक्रमाअंतर्गत ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा राज्यांची 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स'मधील कामगिरीआधारे निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असल्याने तो राज्यात राबवण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेवर केंद्र सरकार ६० टक्के, तर राज्य सरकार ४० टक्के या प्रमाणात खर्च करील. हा प्रकल्प पाच वर्षांसाठी, म्हणजेच २०२०-२१ ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ९७६.३९ कोटी रकमेची गरज लागणार आहे. केंद्राकडून ५८५.८३ कोटी, तर राज्याकडून ३९०.५६ कोटींचा निधी पाच वर्षांच्या कालावधीत उपलब्ध करून दिला जाईल. 'पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, नियमित व गतिशील प्रयत्नांनी अध्ययन निष्पत्ती सुधारणे, योग्य व एकात्मिक शिक्षणाचे प्रयत्न, शाळांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, विशेष बालके, मुली आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर लक्ष केंद्रित करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत,' असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 'देशातील इतर राज्ये आणि परदेशांतील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून तेथील चांगल्या बाबींचा आपल्या शिक्षणात समावेश करण्याचाही उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे सशक्तीकरण करण्याची तरतूदही आहे,' असे विभागाचे संचालक विशाल सोलंकी यांनी सांगितले. आणखी काही उद्दिष्टे शिक्षकांना अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देणे, जागृती निर्माण करणे, अध्ययनापूर्वीची तयारी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल प्रसिद्धी, राष्ट्रीय फलनिष्पत्ती सर्वेक्षणाबाबत रचना करणे, परीक्षा पद्धतीची तांत्रिक रचना करणे इत्यादी. - परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती, शिक्षकांचे प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी परीक्षांच्या मूल्यांकन आकडेवारीचा वापर, एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याबाबत असलेले आव्हान, राज्य स्तरावर अध्ययन निष्पत्ती सर्वेक्षण करणे, विविध शाळा परीक्षा मंडळाद्वारे परीक्षा पद्धतीत सुधारणा. - शिक्षकांचा प्रशिक्षणाद्वारे विकास करून वर्गातील अध्ययन व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3acgGyD
via IFTTT

Post a Comment

0 Comments