Also visit www.atgnews.com
श्रेयांक गुणांत समानता आणण्यासाठी लवकरच सूत्र होणार जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठांच्या चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (श्रेयांक गुण पद्धतीत) एकसमानता आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 'सीईटी सेल'चे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. श्रेयांक गुणांचे टक्केवारीत रूपांतर करताना होणारी असमानता दूर करून, विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार समान श्रेणी मिळण्यासाठीचे सूत्र महिन्याभरात समितीकडून जाहीर करण्यात येईल. राज्यातील विद्यापीठांकडून श्रेयांक गुण पद्धतीत विद्यार्थ्यांना 'सीजीपीए'नुसार श्रेणी दिली जाते. मात्र, प्रत्येक विद्यापीठाचे श्रेणीचे गुणांत रूपांतर करण्याचे सूत्र वेगवेगळे आहे. ठरावीक श्रेणीचे रूपांतर निश्चित गुणांमध्ये करता येत नाही. त्यामुळे सीजीपीए आणि समकक्ष टक्केवारीबद्दल गोंधळ आणि चुकीच्या धारणा निर्माण झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम विविध प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासह प्रवेशाची वेळी आणि इतर शैक्षणिक बाबींवर होतो. या पार्श्वभूमीवर गुण वाटपातील असमानता दूर करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. चिंतामणी जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे डॉ. हरिभाऊ भापकर यांचा समावेश आहे. 'गुणांतील असमानता दूर होईल' विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी एकत्रित श्रेयांक सरासरी गुणांचे टक्केवारीत रूपांतर करताना होणारी असमानता दूर करण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार समान श्रेणीचे वाटप करण्यासाठीचा अभ्यास करून सूत्र सुचविण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. महिनाभरात अहवाल सादर करण्याचेही राज्य सरकारने निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे. बी श्रेणीत ५० ते ५५ असे गुण दर्शवलेले असल्यास विद्यार्थ्यांनी ५० ते ५५ यापैकी किती गुण ग्राह्य धरावेत, याचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37G9uKE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments