मुंबई विद्यापीठ उभारणार सागरी अध्ययन केंद्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सागरी अभ्यासाशी निगडीत शैक्षणिक आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता मिळविण्याकरिता ामध्ये सागरी अध्ययन केंद्र सुरू करण्यात येत आहे. केंद्राच्या माध्यमातून सागरी विकास आणि त्यासंबंधीचे गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन सागरी आव्हानांची उकल आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित केले जाणार आहेत. सागरी अध्ययन व समुद्राशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना, संशोधकांना आणि धोरणकर्त्यांना या अध्ययन केंद्राची मोठी मदत होणार आहे. या केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्षे २०२१-२२ पासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 'सेंटर फॉर एक्सलेन्स इन मेरिटाइम स्टडीज' या केंद्राच्या माध्यमातून सागरी विकास आणि त्यासंबंधीचे गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहे. सर्वसमावेशक आणि समकालिन समग्र पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून मानव्यविद्या, कायदा, वाणिज्य व व्यवस्थान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा आंतरविद्याशाखीय माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण घटकांवर लक्ष केंद्रीत करून गतिशील आणि लवचिक अभ्यासक्रमांवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण आणि समुद्री अभ्यासाच्या संशोधनास प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. सागरी अध्ययन केंद्रामुळे या क्षेत्रामधील कौशल्य वाढीस मदत होईल. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ब्लेंडेड मोडमधून अध्ययन आणि अध्यापन केले जाणार आहे, जेणेकरून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०मधील तत्त्वांशी जुळवून घेण्यास केंद्राला मदत होईल. भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश घेता येणार आहे. सागरी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून मुक्त सागरी संशोधनावर लक्ष केंद्रीत करून सीएसआयआर आणि एनआयओच्या माध्यमातून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 'डीप ओशिएन मिशन' मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. सागरी अध्ययन केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सागरी अध्ययनाच्या माध्यमातून या क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन विकसित आणि विस्तारित करून राष्ट्रीय वृद्धी आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि या केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ. अनुराधा मजुमदार यांनी सांगितले. केंद्रासाठी सल्लागार समिती सागरी अध्ययन केंद्रासाठी सल्लागार म्हणून नौदल, मर्केंटाइल शिपिंग अँड कॉमर्स, मेरिटाइम स्ट्रॅटेजी, मेरिटाइम लॉ, मेरिटाइम हिस्ट्री, मेरिटाइम आणि सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी नामांकित आणि प्रख्यात सल्लागारांची एक समिती स्थापन केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भौगोलिक परिक्षेत्राला ७२० किमी. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे अशा वैशिष्ट्यपूर्ण सागरी अध्ययन क्षेत्रातील नवज्ञान निर्मिती, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सागरी अभ्यास व संशोधनासाठी एक समर्पित केंद्र म्हणून या केंद्रांची स्थापना करणे आवश्यक आहे. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36R3z4V
via IFTTT

Post a Comment

0 Comments