पुण्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंद

म. टा. प्रतिनिधी, शहरातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यासह रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत करोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने हे निर्बंध वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी रविवारी शाळा-महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश काढले आहेत. ऑनलाइन स्वरूपातील शिक्षण सुरूच राहणार असल्याचे यात स्पष्ट केले गेले आहे. तसेच, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान विनाकारण बाहेर फिरण्यावर घातलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे नमूद केले आहे. अत्यावश्यक सेवा आणि शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. ७७४ जण बाधित शहरातील करोना रुग्णसंख्याची वाढ रविवारी कायम होती. दिवसभरात जवळपास साडेसात हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ७७४ नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून शहरात सातशेहून अधिक रुग्णांना करोनाची बाधा होत आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध वाढविण्यात आले आहेत. आजपासून ज्येष्ठांना लस केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार शहरातील ६० वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आजपासून लस मिळणार आहे. त्यासाठी 'को विन' अॅपवर नोंदणी करावी लागणार असून, त्यासाठीच्या इतर सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kxUFPi
via IFTTT

Post a Comment

0 Comments