निवासी शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शासकीय मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू करणे, दिव्यांगाच्या सुविधेसाठी वेब अप्लिकेशन, तृतीयपंथीय घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना आणि ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात आहे. २०२१-२२ या वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागास सर्वसाधारण योजनेतून दोन हजार ६७५ कोटी रुपये व अनुसूचित जाती घटक योजनेतून १०,६३५ कोटी रुपये असा एकूण १३,३१० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्त्वावर सहावीपासून सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. दिव्यांगत्वाचे प्रकार सध्याच्या सहावरून २१ करण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल, असे वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. तृतीयपंथी घटकांतील व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन बीज भांडवल योजना सुरू करण्यात येणार आहे. स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन १० रुपये आकारून प्राप्त होणाऱ्या निधीच्या समप्रमाणात सरकार दरवर्षी अनुदान देईल. आदिवासी विकास राज्यात दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या उपेक्षित आदिवासी घटकांसाठी राज्य सरकारमार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या आणि दुर्गम भागाच्या विकास योजना राबविण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी विकास विभागास नऊ हजार ७३८ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. मॉडेल निवासी शाळा शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यात १०० आश्रमशाळांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. एकलव्य निवासी शाळा राज्यामध्ये या घडीला २५ एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. पुढील तीन वर्षामध्ये या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमाचे इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. आदिम जमातींसाठी वसाहत राज्यात कातकरी, कोलाम व माडिया गोंड या तीन आदिम जमाती आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे पथदर्शी तत्त्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत वसविण्याचे प्रस्तावित आहे. या वसाहतीमध्ये आदिम जमातीच्या लाभार्थींना घरकुल, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा, रोजगार निर्मितीसाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोलाम व माडिया गोंड या आदिम जमातींसाठीदेखील अशाच प्रकारे एकात्मिक वसाहती वसविण्याचे प्रस्तावित आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30tCktm
via IFTTT

Post a Comment

0 Comments