सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा वेळेत सुरू होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे लॉकडाउनची परिस्थिती असली, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने वेळेत सुरू होणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी 'एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन'कडून आयटी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एज्युटेक फाउंडेशन आणि आयटी कंपनीकडून परीक्षा घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. करोना प्रादुर्भाव असल्याने, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा 'एमसीक्यू' स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आयटी कंपनीची नेमणूक केली. या आयटी कंपनीने ऑनलाइन पद्धतीने घेतल्यावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या परीक्षांमधील गोंधळ वाढला; काही विषयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. या एकूणच परिस्थितीचा विचार केल्यावर, विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनकडून ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाला. मात्र, एज्युटेक फाउंडेशनची नव्यानेच निर्मिती झाल्याने, ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत पुरेसा अनुभव नाही; तसेच आवश्यक सॉफ्टवेअर व तंत्रज्ञानाची कमतरता पडू शकते. अशा वेळी परीक्षेत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी एज्युटेक फाउंडेशनने आयटी कंपनीचे सहकार्य घेण्य़ाचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेतून सर्वोत्तम आयटी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती विद्यापीठाकडून घेतली असून, त्याप्रमाणे उपायोजना आखण्याला सुरुवात केली आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब अशा साधनांचा वापर करून देता येणार आहेत. वेळापत्रक तातडीने जाहीर करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू होण्यासाठी साधारण १० दिवसांचा अवधी आहे. मात्र, अजूनही परीक्षांचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. विद्यापीठाच्या वेबसाइटवर चारही विद्याशाखांच्या काही अभ्यासक्रमांचेच वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना, त्यांच्या परीक्षेची माहिती मिळालेली नाही. संपूर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सत्र परीक्षांचे स्वरूप परीक्षा : एमसीक्यू स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने परीक्षांना सुरुवात : १० एप्रिलपासून सराव परीक्षा : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी संख्या : सुमारे पाच ते सहा लाख अभ्यासक्रम : २८४ विषय संख्या : पाच हजार २००पेक्षा अधिक


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cD4vx7
via IFTTT

Post a Comment

0 Comments