राज्यात २५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य; १४ हजार विद्यार्थी गेले राज्याबाहेर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात विविध कारणांमुळे राज्यातील २५ हजार २०४ विद्यार्थी शाळाबाह्य ठरले आहेत. तर, १४ हजार ८४ विद्यार्थी राज्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक १० हजार २८ हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. करोनाकाळात शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने विशेष शोध मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेची एकत्रित आकडेवारी नुकतीच मंत्रालयात सादर करण्यात आली आहे. या माहितीनुसार राज्यात २५ हजार २०४ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे समोर आले. यात विशेष गरजा असलेल्या एक हजार २१२ आणि २८८ बालकामगारांचा समावेश आहे. मुंबईखालोखाल पुण्यात ३ हजार २७८ विद्यार्थी शाळाबाह्य ठरले आहेत, तर या कालावधीत १० हजार २८ विद्यार्थी राज्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. यातील सर्वाधिक आठ हजार ८०१ विद्यार्थी मुंबई उपनगर आणि मुंबई शहरमधील आहेत. रोजगारासाठी अनेक पालकांनी शहर सोडल्यामुळे हे विद्यार्थी बाहेर गेल्याचे समोर आले आहे. याचबरोबर राज्यात सात हजार ७८४ विद्यार्थी परराज्यातून स्थलांतरीत होऊन आपल्या राज्यात आल्याचेही समोर आले आहे. तर, ३३ हजार ५९० विद्यार्थ्यांनी जिल्हांतर्गत स्थलांतर केल्याचे या माहितीमध्ये समोर आले आहे. विद्यार्थी शाळेत गेले नाहीत राज्यात नोव्हेंबर महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही भागांत इयत्ता नववी ते बारावीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या होत्या. मात्र करोनामुळे १३ लाख १५ हजार ८६५ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकले नाहीत, असेही यात सांगण्यात आले आहे. मात्र हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्यक्ष शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांचा एकूण आकडा ७४ लाख ३० हजार १८४ इतका आहे. मात्र हे विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेत होते असे विभागाने स्पष्ट केले आहे. शाळाबाह्य मुलांची जिल्हानिहाय आकडेवारी मुंबई उपनगर - १०१७७, मुंबई - ६४४, ठाणे - ३२३, रायगड - ६५, पालघर - २२८५, पुणे - ३२७८, सोलापूर - २४९, अहमदनगर - ४६३, कोल्हापूर - १०१, सातारा - १८४, सांगली - १२८, रत्नागिरी - ८९, सिंधुदुर्ग - १५२, नाशिक - १८६७, धुळे - १७०, नंदुरबार - १३१६, जळगाव - ७१८, जालना - ७१, बीड - ३२२, परभणी - ११९, लातूर - ३२, उस्मानाबाद - ३९, नांदेड - १६०, अकोला - १०६४, वाशिम - १३, यवतमाळ - १६७, नागपूर - २३९, भंडारा - १९, गोंदिया - ८८, चंद्रपूर - १०७, गडचिरोली - २७७, वर्धा - १७७.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u0XGLR
via IFTTT

Post a Comment

0 Comments