शिक्षणाची 'परीक्षा'

दहावीची परीक्षा रद्द झाली. या निर्णयावर सध्या चर्चा होत आहे. दहावीची परीक्षा कायमची रद्द करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे, असा मतप्रवाहही येतो आहे. या निमित्ताने पद्धतीत काय बदल करणे अपेक्षित आहे, अकरावी प्रवेशासाठी नेमके काय करावे, याचा तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेचा वेध घेणारे हे विशेष लेख... प्रवेशासाठी पर्याय काय? रमेश देशपांडे मागच्या वर्षी आयसीएसई बोर्डाचे काही तर एसएससी बोर्डाचा एक पेपर स्थगित झाला व कालांतराने ते सगळे रद्द झाले. मग वर्षभराच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल लागला. नववी आणि अकरावीच्या अंतिम परीक्षा रद्द होऊन त्यांचे निकाल वर्षभरातील गुणांच्या आधारे लागले. नंतर वर्षभर सर्व स्तरावरचे वर्ग आभासी पद्धतीने चालवावे लागले. डिसेंबर-जानेवारीत दहावीच्या थिअरी परीक्षा व अंतर्गत गुणांकन परीक्षा या प्रत्यक्ष ऑफलाइन पद्धतीने होतील, अशी चिन्हे दिसू लागली. बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले. पण नव्या करोना लाटेमुळे, सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी या प्रमुख बोर्डांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे, अकरावीचे तसेच दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश (डिप्लोमा, आयटीआय इत्यादी) कसे द्यायचे याची चर्चा चालू आहे. यासाठी दहावीच्या गुणांकनाचा विचार करावा लागेल. त्यात अनेक पर्याय समोर येत आहेत. ते पाहू. * पहिला पर्याय प्रवेशपूर्व परीक्षा हा आहे. यात ज्या बोर्डाचे विद्यार्थी राज्य मंडळाच्या अकरावीत प्रवेश घेऊ इच्छितात, अशांना सहभागी व्हावे लागेल. पण यात नेमका अभ्यासक्रम काय असेल? या परीक्षा राज्य मंडळ घेणार की अन्य कोणती संस्था घेणार हे ठरवावे लागेल. तसेच, विद्यार्थ्यांना उजळणी करून घ्यायची जबाबदारी शाळांची असेल. ही परीक्षा एकाच वेळी ऑनलाइन घ्यायची असेल तर सक्षम यंत्रणा लागेल. यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रे लागतील. विद्यार्थ्यांच्या शाळेतच ही परीक्षा केंद्रे लागतील. यासाठी अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती पोहोचवणे व अभ्यास करून घेणे हे आवाहन असेल. अनेक विद्यार्थी व पालक गावी गेले असतील. काही जणांकडे इंटरनेटची सुविधा नसेल. तसेच, शिक्षक, शाळेची तयारी अशा अनेक गोष्टींचा विचार करून मार्ग काढावा लागेल. * यातला दुसरा पर्याय म्हणजे दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारावर गुणपत्रिका देणे. यात वर्षभर शाळा ऑनलाइन चालल्याने अंतर्गत मूल्यमापन कसे झाले हे पाहावे लागेल. अनेक मुले गावी असल्याने मोबाइल, संगणक, इंटरनेट याच्या अडचणी असतील. आर्थिक स्थितीमुळेही अनेकांकडे या सोयी नसतील. यामुळे अंतर्गत मूल्यमापन कसे झाले असेल, हा प्रश्न आहे. अंतर्गत मूल्यमापनाने गुणपत्रिका देणे हा काही विद्यार्थ्यांवर अन्याय़ ठरू शकतो. त्यामुळे नववीचे गुण आणि दहावीचे अंतर्गत गुण असा एकत्रित विचार करून सूत्र निघू शकते. नववीची अंतिम परीक्षाही बहुतांश ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळे वर्षभर नववीत घेतलेल्या उर्वरित परीक्षा व दहावीचे अंतर्गत मूल्यमापन यांची सांगड घालावी लागेल. * वरील दोन्ही पर्यायांचा तिसरा मध्यममार्ग म्हणजे प्रवेशपूर्व परीक्षेतले गुण, नववीचे वर्षभरातले गुण व दहावीचे अंतर्गत मूल्यमापन यांची सांगड घालून येणाऱ्या गुणांचा प्रवेशासाठी उपयोग करणे. यामध्ये अपवादात्मक परिस्थितीतील विद्यार्थ्यांचा वेगळा विचार करता येईल. यात अकरावी व तत्सम प्रवेशात एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, हे पाहावे लागेल. यात सर्व घटकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. तसेच, सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना समान पद्धती लावली पाहिजे. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच, जे सूत्र ठरेल त्याला न्यायालयीन अनुमती घ्यावी. आत्ता अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा पाहिल्या तर ऑनलाइन व ऑफलाइन प्रवेश अशा दोन्ही ठिकाणी जागा कमी नाहीत. यंदा परीक्षा न झाल्यास साधारण दहा टक्के प्रवेश इच्छुक विद्यार्थी वाढतील. मागील वर्षी मुंबई विभागात (एमएमआर) तीन लाख २० हजार जागा ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी ९७ हजार जागा रिक्त होत्या. या ऑनलाइन, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक इन हाऊस अशा संवर्गातल्या जागा होत्या. असेच प्रमाण सर्व सहा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया क्षेत्रांमध्ये असू शकेल. या रिक्त जागांमध्ये कला शाखेच्या अंदाजे १५ हजार, वाणिज्य ४३ हजार, विज्ञान ३५ हजार व एचएसव्हीसीच्या अडीच हजार जागा (सर्व कोटा धरून) रिक्त होत्या. याचा अर्थ दहा टक्के वाढ झाली तरी अडचण येऊ नये. ऑनलाइन प्रवेश ज्या सहा क्षेत्रांत होतात तिथे स्पर्धेमुळे व विद्यार्थिसंख्या आणि इतर अडचणी यामुळे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. ऑफलाइन क्षेत्रात निकाल वाढल्याने प्रवेशाच्या अडचणी येणार नाहीत. या सर्व प्रवेशांमध्ये जरी रिक्त जागा असल्या तरी त्या बऱ्याच विनाअनुदान आणि स्वयं अर्थशासित कॉलेजमधील आहेत. मोठ्या शहरांमध्ये विशिष्ट कॉलेजसाठी स्पर्धा असते. यातील बहुतांश कॉलेजे हे अनुदानित व वरिष्ठ महाविद्यालयाला संलग्न असतील. तसेच, विविध विषयांसाठी स्पर्धा असते. उदा. बायफोकल विषय (इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स इत्यादी), वाणिज्यमध्ये गणित आणि फ्रेंच, जर्मन, मानसशास्त्र इत्यादी विषय. त्यामुळे काही निकष लावून ठराविक कॉलेज व उच्च माध्यमिक विद्यालयांत गेल्या वर्षी ९० टक्के व अधिक गुण मिळालेल्यांचे प्रवेश झालेली महाविद्यालय असू शकतात. विज्ञान विषयातही जागा रिक्त असतात त्यामुळे विज्ञानाच्या (द्विलक्षी विषय सोडून) प्रवेशात अडचण येणार नाही. पण वाणिज्य आणि कला शाखांसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयात स्पर्धा असते. आज विनाअनुदान व स्वयं अर्थशासित महाविद्यालयात जागा असल्या तरी त्यांची फी भरणे काही पालकांना कठीण असू शकते. त्यामुळे अशा महाविद्यालयात फी घेताना काही नियमांचे पालन करावे लागेल. उदा. सर्व फी एकरकमी न घेणे, पालकांना फी भरण्यासाठी पुरेसा वेळ देणे, काही गरजू विद्यार्थ्यांना सवलत देणे, यंदा फीवाढ टाळणे इत्यादी उपाय करावे लागतील. तसेच, काही ठराविक महाविद्यालयांत ५ ते १० टक्के जागा वाढवल्या तर गुणी विद्यार्थी हव्या त्या कॉलेजात जाऊ शकतील. मागील वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभरात एकही मोठी परीक्षा दिलेली नाही. त्यामुळे, हे विद्यार्थी अकरावीत येतील तेव्हा पहिल्या अभ्यासक्रमाचा बॅकलॉगही भरून काढावा लागेल. एकूणच विद्यार्थ्यांना हवे असलेले कॉलेज, त्यांना हवी असलेली शाखा व विषय या सर्वांचे सर्वसमावेशक व सर्वमान्य सूत्र शोधणे हे आव्हान आहे. ते सर्व संबंधितांना एकत्र येऊन पेलावे लागेल. (लेखक अंधेरी येथील भवन्स कॉलेजचे उपप्राचार्य असून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या समितीमधील सक्रिय सदस्य आहेत.) नवीन युगाची नांदी सुरेंद्र दिघे .. देशातील शालेय शिक्षणाची शिखरसंस्था असलेल्या 'केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने धडाडीने निर्णय घेऊन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. या पाठोपाठ राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. या दोन्ही मंडळांचे अभिनंदन. हा निर्णय घेताना या मंडळाने दाखवलेली धडाडी आणि तत्परता कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे देश आणि राज्यभरातील लाखो मुलांची चिंता आणि पालकांचा मानसिक ताण कमी होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर हेच आवश्यक होते. केंद्रीय मंडळाच्या या निर्णयाने नव्या शैक्षणिक युगाची पहाट उजाडली आहे. करोनाच्या काळ्या ढगांना ही चंदेरी झालर लागली. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने घेतलेल्या या धाडशी निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काही पालक गटांनी यांचे स्वागत केले; तर शैक्षणिक वर्तुळात त्याला विरोध होत आहे, आणि तो साहजिक आहे. शिक्षणाची दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या राज्याच्या शैक्षणिक जगात आणि सामाजिक जीवनात दहावीची शालान्त परीक्षा हा अतिशय नाजूक आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि पालक यांचे भावनिक नाते या परीक्षेशी जोडले गेले आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनातील सर्वच संकल्पनांचा पुनर्विचार होत आहे; तेव्हा दहावीच्या परीक्षेचे उपयुक्ततेचेही मूल्यांकन करावयाची वेळ आली आहे. सध्या शालान्त परीक्षेतील गुण हे फक्त अकरावीच्या प्रवेशापुरते उपयोगी पडतात. त्यानंतर या गुणपत्रिकेची किंमत व्यवहारात शून्य असते. गेल्या वर्षीचे अकरावीचे प्रवेश यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत चालू होते. गेले वर्ष अपवादात्मक असले तरी आधीही या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होताच. एकीकडे मुलांना ९० टक्के गुण मिळाले तरी त्यांच्या आवडीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे हजारो जागा रिकाम्या राहून शिक्षण संस्थांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक कायद्यात ज्या सुधारणा झाल्या, त्यापैकी एक तरतूद म्हणजे नववी ते बारावी हा शालेय शिक्षणातला वेगळा स्वतंत्र टप्पा. या टप्प्याचे महत्त्व शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांना कुमारवयातून जाणत्या वयात नेताना, त्यांना सर्व अर्थांनी सक्षम करण्यासाठी या टप्प्यातील शिक्षण हे साधन शिदोरी म्हणून वापरले आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून यातील दहावीच्या शालान्त परीक्षेचे महत्त्व कमी केले आहे. ही परीक्षा फक्त विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करेल. त्यांना पास अथवा नापास ठरवणार नाही. बारावीची परीक्षा ही खरी शालेय पातळीवरील अंतिम परीक्षा असणार आहे. हीच पद्धत साधारणपणे जगभर आहे. नवीन धोरणात कनिष्ठ महाविद्यालय ही संकल्पना कालबाह्य करण्याची सूचक तरतूद आहे. प्रथमतः नववी ते बारावी हे सर्व वर्ग उच्च माध्यमिक म्हणून शालेय शिक्षणाचा भाग असतील. त्यांच्या शेवटच्या दोन वर्षांवर कला, वाणिज्य, अथवा विज्ञान असा शिक्का नसेल. अभ्यासक्रमात लवचिकता असेल. एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान व अर्थशास्त्र हे दोन्ही विषय आवडले तर त्याला तसा अभ्यास करता येईल. मुख्य म्हणजे महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवर संस्था-एनटीए असेल. प्रवेश परीक्षेतील गुणानुक्रमे देशातील कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. एकदा अकरावीला प्रवेश घेतल्यावर त्याच महाविद्यालयात पदवी पुरी होईल, असे असणार नाही. अर्थात हे बदल लगेच होणार नाहीत. त्यासाठी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती लागेल. सर्व घटकांची मानसिकता तयार व्हावी लागेल. या बदलांबरोबर मुख्य बदल दृष्टिकोनात करावा लागेल. दहावीतले गुण हे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ कसोटीवर टिकणारे आहेत की नाहीत, ते तपासावे लागेल. माध्यमिक शाळांचा दर्जा वाढवावा लागेल. या शाळांची भौतिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमता वाढवणे हे आता आव्हान आहे. (लेखक ठाण्यातील 'जिज्ञासा ट्रस्ट' या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.) चक्रव्यूह भेदताना जयवंत कुलकर्णी यंदा दहावीच्या रद्द झाल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याची ठाम भूमिका शिक्षणमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे, या विद्यार्थ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता बोर्ड परीक्षेला सुसज्ज राहायला हवे. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय घ्यावा लागला. काहींना तो सुखावह वाटला तर काहींच्या मनात ताणतणाव व प्रश्न निर्माण झाले. बारावीचे १४ लाख विद्यार्थी, पालकांचे प्रश्न व ताणतणाव थोडे निराळे आहेत. मात्र, या निर्णयाचा 'सर्क्युलर इफेक्ट' बारावीच्याही विद्यार्थ्यांवर होत आहे. बारावीचा अभ्यास तसेच अनेक प्रवेश परीक्षांची व शाखा निवडीची एकत्रित चिंता, अनिश्चितता, असुरक्षितता, भीती, मानसिक अशांतता या समस्या मुलांना भेडसावत आहेत. विविध भावनिक समस्यांचे चक्रव्यूह आहेतच. त्यांचाही विचार करावा लागेल. भविष्यातल्या शैक्षणिक, व्यवसायिक बदलांसाठी जागरूक राहणे, काटेकोर नियोजन करून स्वतःमध्ये बदल घडवणे आणि शिक्षणाच्या प्रवाहातील प्रत्येकास सक्षम करणे ही सामूहिक जबाबदारी सर्वांना मिळून पेलावी लागेल. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १) बोर्ड परीक्षा रद्द झाल्या तरी सर्व विषयांचा सखोल अभ्यास मुळीच थांबवू नका. उलट आता केवळ परीक्षार्थी म्हणून न राहता विद्यार्थी बनून अधिक चांगला करता येईल. २) आपल्या विषय शिक्षकांनी अंतर्गत मूल्यमापनासाठी वर्षभर दिलेले गृहपाठ, निबंध, प्रयोग वह्या, प्रात्यक्षिक कामे, प्रकल्प, सराव उत्तरपत्रिका या बाबी पूर्ण करा. ३) अकरावीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा किंवा कोणत्याही मूल्यमापनाबाबत विचार चालू असला तरी त्याचे दडपण न बाळगता मनाची उत्तम तयारी ठेवा. त्यासाठी पुरेसा वेळ, विस्तृत माहिती आणि शिक्षकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल. पाठ्यपुस्तके सखोल अभ्यासा. अफवांवर विश्वास ठेवू नका. या संदर्भात बोर्डाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर माहिती घ्या. ४) विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अत्यंत जाणकार, अनुभवी असे सरकारी अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ विविध उपाय योजून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा. ५) करोनाच्या बातम्या, दुर्घटना, लॉकडाऊन, गुन्हेगारी विश्वाच्या घडामोडी यापासून स्वतःला दूर ठेवा. त्यात वेळ वाया घालवू नका. ६) तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायाम, मनोरंजन, पुरेशी झोप, कुटुंबियांशी संवाद, एकत्र जेवण या सोबत मास्कचा व सँनिटायझरचा वापर, परस्परांतील अंतर, नियमित स्वच्छता या गोष्टी कटाक्षाने पाळा. ७) maa.ac.in या संकेतस्थळावर राज्य मंडळाने प्रशिक्षित समुपदेशकांची यादी आणि भ्रमणध्वनी क्रमांकासह मोफत समुपदेशन सेवा दिली आहे. तिचा लाभ घ्या. ८) महाराष्ट्र शासनाने महाकरिअर पोर्टलची निर्मिती केली आहे. आपल्या शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक/ प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांनी स्वतःचा SARAL ID घेऊन 123456 या बाय डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉगीन करावे. यात ५५५ करिअर क्षेत्र, २१ हजार महाविद्यालयांतील अभ्यासक्रम, ११५० प्रवेश परीक्षा तसेच बाराशे शिष्यवृत्त्याची विस्तृत माहिती मिळू शकते. त्यासाठी वेळ काढून या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी भेट द्या. https://ift.tt/2WWXaQZ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वरील प्रवेशाचे मुद्दे वगळता इतर सर्वच बाबी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस मार्गदर्शक ठरतात. आपल्याला मिळालेला वाढीव वेळ आणि २५ टक्के अभ्यासक्रमातील सूट याच्या आधारे ही बोर्ड परीक्षा आपण नक्कीच तणावमुक्त मनाने देऊ शकतो, हा आत्मविश्वास बाळगा. पालकांसाठी मुलांशी प्रेमळ संवाद साधा. त्यांना मिळेल त्या यशात मनमुराद आनंद मिळवा. एक आश्वासक पाठबळ द्या. मुलांचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य जपा. यामुळे, त्यांच्या पंखांत नवे बळ येईल. शिक्षकांसाठी आपले प्रयत्नच समस्यांचे चक्रव्यूह भेदण्याची संजीवन शक्ती देऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातली उणीव भरून काढण्याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारूया. गरज आहे ती फक्त त्याच्या पाठीशी शिक्षक, पालक, शासन, प्रशासन यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे अभेद्य कवच उभारण्याची. (लेखक शिक्षक समुपदेशक आहेत.) शैक्षणिक नियोजन मंदार शिंदे यंदाही शाळा वेळेवर, म्हणजे १५ जूनला, सुरू होणार नाहीत असे गृहीत धरून आत्ताच नियोजन करावे लागेल. त्या दृष्टीने खालील मुद्द्यांवर विचार, चर्चा, आणि कृती व्हावी. (१) पुढील इयत्तांची पटनोंदणी कशी करावी याचे नियोजन करावे लागेल. पुढे आलेल्या मुलांची नावे शाळेकडे आहेतच; परंतु शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात सापडलेली मुले, करोना काळात पालकांसोबत स्थलांतर होऊन गेलेली किंवा आलेली मुले, वयानुरुप पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेणारी मुले, यांना विचारात घेऊन पटनोंदणीचे नियोजन करावे. त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी गृहभेटी कराव्यात का? शक्य असेल तिथे, पालकांशी फोनवरून संपर्क साधता येईल का? मुलांची माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या इतर विभागांची मदत घेता येईल का? उदाहरणार्थ, जन्म-मृत्यू नोंदी, अंगणवाडी, रेशनिंग आणि आधार डेटा, इत्यादी. या पर्यायांची चाचपणी व्हावी. (२) चालू शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाने आणि शिक्षकांनी पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवली. मुलांना शाळेत येणे शक्य नसेल अशा ठिकाणी ती घरपोच केली. आता पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत कशी पोहोचवता येतील? यावेळी पूर्वनियोजन आणि इतर शासकीय विभाग (उदाहरणार्थ, पोस्ट खाते) यांच्या माध्यमातून जलद आणि खात्रीशीर वितरण करता येईल का? (३) पुढील वर्षी मुले प्रत्यक्ष शाळेत येण्याचे प्रमाण कमी राहील, असे गृहीत धरून, पालक आणि/किंवा गाव-वस्ती पातळीवर शिक्षण सहायक किंवा स्वयंसेवक यांची निवड व सक्षमीकरण असा कार्यक्रम राबवता येईल का? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 'पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान' यासंबंधी वस्ती पातळीवरील साक्षर स्वयंसेवकांचा सहभाग घ्यायचे सुचवले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षकांसाठी सूचना असतात तशा पालक/स्वयंसेवक यांच्यासाठी सूचना (सुलभकाच्या भूमिकेतून) समाविष्ट करता येतील का? स्वयंसेवकांकडून विना-मोबदला कामाची अपेक्षा करण्याऐवजी, वस्तीमधील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना अर्धवेळ रोजगाराची संधी देता येईल का? (४) वस्तीपातळीवर आठ-दहा-पंधरा मुले एकत्र येऊन काही कृती करू शकतील अशी उपकेंद्रे (सॅटेलाईट सेंटर) सुरू करता येतील का? अशा ठिकाणी इंटरनेट कनेक्शन, कॉम्प्युटर, स्क्रीन, पुस्तके, अशी काही साधने शाळेमार्फत उपलब्ध झाल्यास ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती व परिणाम वाढेल. अशा उपकेंद्रांवर शिक्षकांनी ठराविक दिवशी काही उपक्रम राबवावेत, मूल्यमापन करावे. इतर दिवशी सुलभक (फॅसिलिटेटर) यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवता येईल. विशेषतः वस्तीमधील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक/स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाची सोय अशा सॅटेलाईट सेंटरवर करता येईल. (५) चालू शैक्षणिक वर्षात काही शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांनी राबवलेला प्रत्यक्ष कार्यपत्रिकेचा (ऑफलाईन वर्कशीटचा) प्रयोग अभ्यासून सर्वत्र राबवता येईल का? वर्कशीटमुळे मुलांचे ऑनलाईन अवलंबन कमी होऊ शकेल, तसेच विद्यार्थ्यांकडून वर्षभर लेखी स्वरूपात साहित्य जमा होत गेल्याने मूल्यमापनासाठी शिक्षकांना मदत होईल. वर्कशीटचे वितरण, संकलन यासाठी आतापासून नियोजन करता येईल का? पोस्ट किंवा खाजगी कुरियर कंपन्या, अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांचे जाळे वापरता येईल का? (६) यंदा सगळे उपक्रम, मैदानी खेळ व कला विषयांकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. पुढील वर्षामध्ये या गोष्टी कशा राबवणार याचे पर्यायी नियोजन करता येईल का? शाळा आणि शिक्षक यांच्याशिवाय शासकीय आणि सामाजिक घटकांचा वापर करून घेता येईल? स्थानिक उद्याने आणि खेळाची मैदाने, खाजगी क्रीडा प्रशिक्षण संस्था, यांच्याशी समन्वय साधून मुलांना सुरक्षित आणि नियमित सुविधा देता येतील का? (७) मार्च २०२२ मध्येही दहावी-बारावीची सार्वत्रिक परीक्षा घेता येणार नाही असे गृहीत धरून नियोजन करता येईल का? यासाठी राज्य मंडळाकडून तिमाही मूल्यमापनाचे प्रश्नसंच देता येतील का? बोर्डाकडून हे प्रश्नसंच शाळांना नियमितपणे पाठवले, तर विद्यार्थी शाळेत जाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, तिमाही परीक्षा देऊ शकतील आणि शाळेतून एकत्रितपणे उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठवण्याची सोय करता येईल. अर्थात, यासाठी शाळा किंवा सॅटेलाईट सेंटरद्वारे पुरेसे मार्गदर्शन प्राप्त व्हायला हवे. परीक्षा हवी की नको, सरसकट पुढील वर्गात प्रवेश द्यावा की नाही, या विषयावरील चर्चा आता थांबवून, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. यात शिक्षणाच्या नवीन माध्यमांचा विचार प्रामुख्याने व्हावा. उदाहरणार्थ, 'बिल्डींग ऐज अ लर्निंग एड' या 'बाला' संकल्पनेच्या धर्तीवर 'कम्युनिटी ऐज अ लर्निंग एड' अशा ('काला'?) संकल्पनेवर काम करता येईल का? फक्त पाठ्यपुस्तकातूनच नव्हे, तर शाळेची इमारत, परिसर, वस्तू, यांच्या माध्यमातून मुले काहीतरी शिकू शकतील अशा प्रकारे शाळेच्या भिंती आणि परिसर रंगवण्यात आले, मजकूर नोंदवण्यात आला. आता मुले वस्तीमध्येच राहणार असतील तर, सार्वजनिक भिंती, शासकीय इमारती, मंदिरे, उद्याने, झाडे, बसेस, रिक्षा, अशा सर्व ठिकाणी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काही मजकूर/साहित्य उपलब्ध करता येईल का? घंटागाडी आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षा, तसेच धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचा मुलांच्या शिक्षणासाठी वापर करता येईल का? वरील सर्व सूचना वैयक्तिक अनुभव आणि विचारातून मांडलेल्या आहेत. तज्ज्ञ, अनुभवी, आणि अधिकारी व्यक्तींनी योग्य तो बदल, चर्चा, कार्यवाही करावी. करोनावर नियंत्रण प्राप्त होऊन परिस्थिती पूर्ववत झाली तर चांगलेच आहे, पण तसे न झाल्यास, आणखी एक वर्ष (किंवा पुढील काही वर्षे) मुलांच्या शिक्षणाचा बळी जाऊ नये! (लेखक पुण्यातील बालहक्क कृती समितीचे संयोजक आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32JdbMH
via IFTTT

Post a Comment

0 Comments