मुंबई विद्यापीठामार्फत MMS, MCA सारखे डिस्टन्स अभ्यासक्रम लवकरच

म. टा. विशेश प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संधीचा फायदा देशातील अनेक मुक्त अध्ययन केंद्रांनी घेतला आहे. यात मुंबई विद्यापीठाचे दूर व मुक्त अध्ययन केंद्रातर्फेही एमएमएस, एमसीएसारखा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेकडे सादर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमध्ये () मागील १० वर्षांपासून एकही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर आता मुंबई विद्यापीठाने बीएमएस, बीएमएम, बीएएफसारखे अभ्यासक्रम आयडॉलच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेत मांडण्यात येणार आहे. विद्धत परिषद व त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मान्यता मिळाल्याशिवाय हे अभ्यासक्रम सुरू होणार नाहीत. आयडॉलच्या माध्यमातून सध्या पारंपरिक अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहेत. यामध्ये पदवीस्तरावर बीए, बीकॉम, बीएससी, बीएससी आयटी आणि पदव्युत्तर स्तरावर एम, एमकॉम, एमसीए आणि एमएससी आयटी आणि एमएससी मॅथेमॅटिक्स हे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये बीएएफ व बीएमएस अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. त्यांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आयडॉलच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा विचार विद्यापीठाकडून सुरू आहे. नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमही विद्यापीठातील विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. या अभ्यासक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे महाविद्यालयांच्या उत्पन्नामध्येही मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचाही विचार आयडॉलच्या माध्यमातून ८ ते १० नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार सुरू आहे. यामधील काही अभ्यासक्रम हे मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि विद्यापीठाचे जर्नालिझम विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठाने अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आवश्यक सर्व गरजा पूर्ण केल्यास काही अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिकवण्यास नुकतीच यूजीसीने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्धत परिषद व त्यानंतर यूजीसीकडून मान्यता मिळाल्यानंतर या अभ्यासक्रमांचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uWCpmX
via IFTTT

Post a Comment

0 Comments