नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर विविध कॉलेजांच्या प्राचार्यांकडून झालेल्या जोरदार विरोधानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कॉलेजस्तरावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ५ मे ते २० मेदरम्यान या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. करोनासाथीमुळे त्या आता किमान एक महिना पुढे ढकलण्यात येणार आहेत. पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा कॉलेजस्तरावर घेण्याच्या सूचना नागपूर विद्यापीठाने सर्व कॉलेजांना केल्या होत्या. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या करोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. अनेक कॉलेजांमधील प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय करोनाशी झगडत आहेत. परीक्षा ऑनलाइन असली तरी त्यांचे संचालन करण्यासाठी कॉलेजांमध्ये कर्मचारी उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात शक्य नाही. अशा स्थितीत या परीक्षा कॉलेजस्तरावर घेणे अशक्य आहे. त्यामुळे, त्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्राचार्य फोरमने केली होती. परीक्षा घेण्यास कॉलेजांचा तीव्र विरोध असल्याचे वृत्त 'मटा'ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. याशिवाय, व्यवस्थापन परिषदेतूनही करोनासंसर्गादरम्यान परीक्षा घेण्यास विरोध होता. परिषदेचे सदस्य डॉ. आर. जी. भोयर यांच्यासह इतर काही प्राधिकरण सदस्यांनी यासंदर्भात कुलगुरूंकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठाने कॉलेजस्तरावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्यातही अडचणी येत होत्या. वर्धा जिल्ह्यात ८ ते १३ मे दरम्यान कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याही अनेक अडचणी आहेत. आता अर्ज भरण्याच्या मुदतीतही वाढ होणार आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3erm0kL
via IFTTT

Post a Comment

0 Comments