दहावीचा तिढा सुटला; नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन, ११वीसाठी वैकल्पिक सीईटी

Update: कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या. दहावीच्या निकालाचे नेमके सूत्र कसे? दहावीचा निकालाचे सत्र शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे हे सूत्र खालीलप्रमाणे - - विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० गुण - विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे २० गुण - विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे ५० टक्के वेटेज - वरीलप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुणांपैकी मूल्यांकन होणार - म्हणजेच प्रत्येक विषयातील १०० गुणांपैकी नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वेटेज वापरून तयार होणार अंतिम निकाल अकरावीसाठी ऐच्छिक सीईटी विविध परीक्षा मंडळांनी या वर्षी इयत्ता दहावी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे ही परीक्षा मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असे शंभर गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न व ओएमआर पद्धतीने दोन तासाची परीक्षा घेण्यात येईल इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबवितांना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेला जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुले असतील व त्या जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ToWwMZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments