आईचा त्रास कमी करण्याची जिद्द; मुलाने बनवले हवेशीर PPE Kit

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पीपीई किटच्या सततच्या वापरामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. याबाबतचे वृत्त वाचून आणि आपल्या डॉक्टर आईची अवस्था पाहून के. जे. सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निहाल सिंग या विद्यार्थ्याने हवेशीर पीपीई किटची निर्मिती केली. त्याच्या या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या हवेशील पीपीई किटला 'कोव्ह टेक व्हेंटिलेशन प्रणाली' असे नाव देण्यात आले आहे. सध्याच्या पीपीई किटमध्ये हवा खेळती राहण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना ते परिधान करून काम करणे अवघड जाते. यावर विचार सुरू असतानाच निहालला कोव्हिडसंबंधित उपकरणे डिझाइन करण्याच्या टेक्नोलॉजीकल बिझनेस इन्क्युबेटर, रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेविषयी कळले. यात त्याने भाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील डॉ. उल्हास खारुल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रणालीचे डिझाइन तयार केले आणि एक मॉडेलही तयार केले. डॉ. उल्हास स्वत: एक स्टार्टअप चालवतात. त्यांचे स्टार्टअप हे हवा गाळण्यासाठी उपयुक्त असे पटल तयार करतात. याचाच वापर निहालने आपल्या उपकरणामध्ये करण्याचा विचार केला. यानुसार प्रयोग करून पाहिल्यावर तो यशस्वीही झाला. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संधोधन नवोन्मेष इन्क्युबेशन डिजाइन प्रयोगशाळेची (रीडिल) त्याला या कामात मदत मिळाली. मूळ उपकरण आम्ही डॉ. विनायक माने यांना दाखवले. त्यांनी असे लक्षात आणून दिले की, या उपकरणातून सातत्याने निर्माण होणारी कंपने आणि त्यांच्या आवाजामुळे मानेभोवती हे उपकरण घालणे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक होईल. त्यामुळे मग आम्ही तो नमुना रद्द केला आणि नव्या प्रकारच्या डिझाइन निर्मितीवर काम करायला लागलो आणि हे उपकरण तयार झाले, अशी माहिती निहाल याने दिली. त्याच्या या प्रयोगात डिझाइन अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या रित्विक मराठे आणि सायली भावसार तसेच आईने मदत केली. सहा महिन्यांच्या परिश्रमांचे फळ सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर या उपकरणाचा पहिला टप्पा पार पडला आणि अखेर इंग्रजी अद्याक्षर 'यू'च्या आकारातील उपकरण तयार झाले. हे उपकरण पीपीई किटच्या मागच्या बाजूस लावता येऊ शकते. याद्वारे आजूबाजूची हवा गाळून पीपीई किटच्या आतमध्ये जाते. या प्रणालीचे डिझाइन हवा बंदिस्त ठेवण्याचे काम करते आणि दर शंभर सेकंदांना थंड हवा आत सोडते. हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत आहेत. याचा वापर काही रुग्णालयांमध्ये सुरू झाला आहे. लवकरच ते जास्तीत जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्या पुढील संशोधनासाठी 'प्रयास' या संस्थेतर्फे दहा लाख रुपये तर रिडिलतर्फे पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wCWiQN
via IFTTT

Post a Comment

0 Comments