हिवरे बाजारचे आणखी एक पाऊल,गावाच्या जबाबदारीवर शाळा सुरू

म.टा. प्रतिनिधी, नगर : करोनामुक्त गाव मोहीम राबविल्यानंतर आदर्शगाव हिवरे बाजारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावाने जबाबदारी घेत गावातील प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आली आहे. माध्यमिक शाळा या आठवड्यातच सुरू झाली असून प्राथमिक शाळा पुढील आठवड्यात भरणार आहे. शाळा सुरू करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान गृहीत धरून योग्य ती दक्षता घेत आणि गावाने जबाबदारी स्वीकारून हा निर्णय घेतल्याचे संकल्प आणि कार्य समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आलेले असले तरी शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गावाने करोनामुक्त गाव ही संकल्पना राबवून गाव करोनामुक्त केले. त्यानंतर राज्याने हा पॅर्टन स्वीकारला. सरकारी पातळीवर ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू करण्यात आली. गावात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. त्यातील माध्यमिक शाळा सध्या सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे तीनशे विद्यार्थी आहेत. यासंबंधी पवार यांनी सांगितले की, ‘शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. ऑनलाइनचा पर्याय असला तरी सर्वच मुलांना ते शक्य होत नव्हते. यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. आम्ही घेतलेल्या चाचणीत ते दिसूनही आले. यामुळे शाळा सुरू करा, अशी पालकांची मागणी होती. याशिवाय जिल्हा परिषदेच्या एका सभेत शाळा सुरू करण्याचा प्रयोग गावाने करावा, अशी सूचना काही सदस्यांनी मांडली होती. त्यामुळे आम्ही शाळा सुरू करण्यासंबंधी सरकारी अधिकाऱ्यांकडे चाचपणी केली. मात्र, यासाठी परवानगीही मिळाली नाही आणि विरोधही झाला नाही. त्यामुळे गावाने आपल्या जबाबदारीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालकांना यासंबंधी कळविले. सर्व ते नियम पाळून शाळा सुरू करण्यात आली. शाळेत पन्नास टक्के विद्यार्थी बाहेर गावाचे आहेत. सर्वच विद्यार्थ्यांची दररोज तपासणी केली जाते. त्यासाठी नियमही करण्यात आले आहेत. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सध्या शाळा भरते. डबा आणण्यास बंदी आहे. केवळ पाण्याची बाटली घेऊन यायची. मैदानावर खेळायचे नाही, दुकानात जायचे नाही, गावात रेंगाळायचे नाही. फक्त शाळा ते घर एवढीच विद्यार्थ्यांना परवानगी आहे. बहुतांश शिक्षक गावातच राहतात. जे राहत नाहीत त्यांना तशी विनंती करण्यात येत आहे. शाळांचे वर्ग मोठे असल्याने सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविता येते. आता प्रथामिक शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. २१ जूनपासून पहिली ते चौथी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा सुरू होणार आहे. त्यासंबंधी जिल्हा प्रशासनाला पत्र देणार आहोत. तीही शाळा आमच्या जबाबदारीवरच सुरू करणार आहोत. सकाळी दोन ते तीन तास एवढ्या वेळेत सुरवातीला शाळा भरविली जाईल. अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,’ असेही पवार यांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिला जाणार आहे. असे असले तरी या मुलांना पुढे अडचण येऊ नये यासाठी ४० गुणांची चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जून रोजी हिवरे बाजारच्या शाळेत ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, पुढील शिक्षणात त्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gCWHxm
via IFTTT

Post a Comment

0 Comments