बारावी निकालावरून शिक्षक संभ्रमात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. बारावीचा निकाल () कसा जाहीर करायचा, याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. यातच सर्वोच्च न्यायालयाने बारावीचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लकवर मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. करोना साथीमुळे असलेले निर्बंध पाळत यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दहावीचा निकाल कोणत्या निकषांच्या आधारे प्रसिद्ध करायचा याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करून त्यानुसार कामही सुरू झाले आहे. मात्र बारावीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर ३१ जुलैच्या आत बारावीचा निकाल जाहीर करायचा असेल, तर राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन वेळीच मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल देणे शक्य होईल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मुंबईसारख्या शहरात निकालाचे काम करण्यासाठी कामावर जाण्यास शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभ मिळावी, यासाठी वेळीच तरतूद करावी आणि शिक्षकांना मागणी करण्यासाठी भाग पाडू नये, असेही मत शिक्षक व्यक्त करत आहेत. दोन दिवसांत निर्णय? बारावीच्या मूल्यमापन निकषांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. निकालाचे निकष ठरविण्यासाठी शिक्षण विभागाने विविध घटकांशी चर्चा केली आहे, त्यानुसार लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केला. सरकारने मूल्यांकनाचे निकष जाहीर केल्यानंतर सर्व शिक्षक सहकार्य करतील आणि विद्यार्थ्यांना वेळेत निकाल देतील, असेही आंधळकर यांनी सांगितले. वेळेत निकष जाहीर झाले, तर वेळेत निकाल जाहीर होऊ शकेल, असा विश्वास पालकांना वाटत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T7clIn
via IFTTT

Post a Comment

0 Comments