डझनभर आंबे घेतले सव्वा लाखात! शिक्षणासाठी सरसावले हात

म. टा. प्रतिनिधी, मुंबई एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये! म्हणजे एक लाख वीस हजार रुपये प्रतिडझन. हा दर वाचून नक्कीच डोळे विस्फारतील. पण, त्या रकमेतून कुणाचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार असेल तर? मुंबईतील एका मराठी उद्योजकाने हाच विचार करून दहा हजार रुपयाला एक आंबा याप्रमाणे बारा आंबे खरेदी केले. त्यातून मिळालेल्या रकमेमुळे एका चिमुकलीला शिक्षण घेता येणार आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन विकत घेऊन ती पाचवीच्या ऑनलाइन शिक्षणात सहभागी होणार आहे. ही चिमुकली आहे जमशेदपूरची तुलसी आणि हे मराठी उद्योजक आहेत व्हॅल्युबल एज्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अमेय हेटे. करोनाचे संकट, लॉकडाऊन यामुळे सध्या अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातही काही जण परिस्थितीशी झुंज देत आहेत. जमशेदपूर येथील बागुनाधू भागात राहणारी बारा वर्षीय तुलसी कुमारी पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. तेथील किन्नान स्टेडियमनजीक रविवारी ती आंबेविक्री करीत होती. लॉकडाउनमुळे रस्ते ओस पडलेले असतानाही आंबे विकणाऱ्या या एकट्या मुलीची एका स्थानिक पत्रकाराने उत्सुकता म्हणून सहज चौकशी केली. तेव्हा तुलसीने तिच्या संघर्षाची कहाणी कथन केली. 'आंबेविक्रीतून मला पाच हजार रुपये कमवायचे आहे. मोबाइल फोन नसल्याने माझे ऑनलाइन शिक्षण खंडित झालेले आहे. पैसे गोळा होताच मी शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाइल फोन विकत घेणार असल्याचे तुलसीने त्या पत्रकाराला सांगितले. तिच्या संघर्षाची ही कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर व्हायरल झाली. तिच्या जिद्दीला अनेकांनी सलाम केला. 'व्हॅल्युबल एज्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांनी केवळ तिच्याबद्दल सद्भावना व्यक्त न करता चक्क तिच्या टोपलीतील एक आंबा दहा हजार रुपयांप्रमाणे डझनभर आंबे एक लाख वीस हजार रुपयांना विकत घेतले. ही रक्कम त्यांनी तिच्या वडिलांच्या बँक खात्यात वर्गही केली. लॉकडाउनमुळे माझ्या वडिलांची नोकरी गेल्याने कुटुंबासमोर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला. सध्या शाळेचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. पण, अँड्रॉइड फोन नसल्याने मला ते पाहता येत नव्हते. म्हणूनच पैसे कमावण्यासाठी मी आंबे विकण्यास सुरुवात केली होती. माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. आता मी रोज ऑनलाइन वर्गात सहभागी होतेय. - तुलसी कुमारी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hdYkRf
via IFTTT

Post a Comment

0 Comments