'आर्किटेक्चर'साठी 'नाटा' अनिवार्य

पुणे : बॅचरल ऑफ आर्किटेक्चर (बी-आर्च) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नॅशनल अॅप्टिट्यूट टेस्ट इन आर्किटेक्चर () प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपर्य़ंत जेईई (आर्किटेक्चर) प्रवेश परीक्षेच्या गुणांद्वारेही या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येत होता. दरम्यान, नाटाची सक्ती करण्यापूर्वी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत जेईईचे गुण ग्राह्य धरणार का, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) आपली भूमिका गुलदस्तातच ठेवली आहे. विविध राज्ये बी-आर्च अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. त्यामुळे देश पातळीवरील प्रवेश प्रक्रियेत सूसुत्रता येण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई (आर्किटेक्चर) प्रवेश परीक्षा घेण्याला सुरुवात झाली. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी वास्तुकला परिषदेने (कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर) यंदाच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षापासून नाटा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बी-आर्च अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याबाबतच्या सूचना २३ जुलै रोजी राज्यांना केल्या आहेत. नाटा प्रवेश परीक्षेव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेच्या आर्किटेक्चर प्रवेशासाठीच्या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण असला, तरी त्याला नाटा परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल, अशीही सूचना परिषदेने दिली आहे. त्यानुसार डीटीईने परिपत्रक प्रसिद्ध करीत राज्यात बी-आर्च प्रवेशासाठी नाटा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. राज्यातील महाविद्यालयांनी याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशा सूचना डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिल्या आहेत. वास्तुकला परिषदेने प्रवेशासाठी नाटा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे पत्र २३ जुलै रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर डीटीईने या पत्राचा आधार घेऊन नाटा अनिवार्य असल्याची माहिती दोन ऑगस्ट रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध केली. मात्र, गेल्या वर्षीपर्यत जेईई (आर्किटेक्चर) आणि नाटा अशा दोन्ही प्रवेश परीक्षांच्या गुणांवर बी-आर्च अभ्यासक्रमासासाठी प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली आहे. या परीक्षेतील गुणांचा प्रवेशासाठी उपयोग होणार आहे का, याबाबत स्पष्ट सूचना नाही. असे असतानाच आता विद्यार्थ्यांना नाटा प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठीच्या शुल्काचा भुर्दंड पुन्हा पालकांना सोसावा लागणार आहे. नाटा परीक्षेची शेवटी संधी विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये बी-आर्च अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा, यासाठी नाटा परीक्षा येत्या तीन सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी यावर्षी दोनदा झालेल्या नाटा परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत किंवा त्यांना परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी राहणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.nata.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन डीटीई आणि वास्तुकला परिषदेने केले आहे. ... राज्यातील बी-आर्च अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नाटाच्या गुणांवर कशा पद्धतीने पार पडेल, याबाबत डीटीईने सविस्तर माहिती पत्रक प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. प्रवेश प्रक्रियेत जेईईच्या गुणांना ग्राह्य धरणार का, या परीक्षेच्या गुणांचा उपयोग होणार का, याबाबत सुद्धा स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना मदत होईल. - डॉ. अनुराग कश्यप, प्राचार्य, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर विमेन


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Af6Bw8
via IFTTT

Post a Comment

0 Comments