कॉलेज सुरू होण्यात अडथळा; अजित पवारांच्या घोषणेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे, पुणे जिल्ह्यातील कॉलेज आज, मंगळवारी सुरू होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. तर, प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा, तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा उत्साहात सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ ऑक्टोबरपासून पुणे जिल्ह्यातील विद्यापीठे, कॉलेज सुरू होतील, असा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुणे महापालिकेने 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाला पुणे विद्यापीठासोबत इतर अकृषी विद्यापीठांना आदेश देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा उच्च शिक्षण संचालनालयाचे कॉलेज सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठालाही संलग्न कॉलेज सुरू होण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करता येत नसल्याचे चित्र आहे. या सर्व गोंधळामुळे आज मंगळवारी १२ ऑक्टोबरला कॉलेज सुरू होण्याबाबत साशंकता आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग सुरू होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्वायत्त असल्याने, आज मंगळवारपासून विद्यापीठाला शैक्षणिक विभाग सुरू करता येणार आहे. स्थानिक प्रशासनाचे आदेश पुणे विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक विभागांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण ऑफलाइन पद्धतीने सुरू करता येईल. पुणे विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग काही दिवसांत टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे लेखी आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते आदेश आल्यानंतर राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांना त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील. - डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय खासगी विद्यापीठे सुरू होणार? पुणे जिल्ह्यात खासगी विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालये आहेत. पुणे स्थानिक प्रशासनाचे आदेश असल्याने, ही विद्यापीठे आणि महाविद्यालये आज मंगळवारी सुरू होऊ शकतात. त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू होतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lybYSx
via IFTTT

Post a Comment

0 Comments