विद्यार्थ्यांना इंग्रीजीची अडचण येणार नाही, शिक्षणविभाग उचलणार 'हे' पाऊल

मुंबई: राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अत्यावश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी भाषेची अडचण येऊ नये यासाठी इंग्रजीतील संकल्पना बालपणापासूनच स्पष्ट होण्याची आवश्यकता असते. यादृष्टीने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी आज प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या ४८८ आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक आणि द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी या शाळांमध्ये दुसरीच्या वर्गामध्ये अशा अभ्यासक्रमांचा समावेश करावा असे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन मराठी शब्दांच्या जोडीला समानार्थी आणि सोप्या इंग्रजी शब्द आणि वाक्यांचा वापर करण्यात यावा. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर (ऑनलाईन) उपस्थित होते. संविधान मूल्यांचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य समजण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले. शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागामार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येऊन याबाबतचा आढावा घेण्यात आला. प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या विद्यार्थ्यांना पहिली पासून मूल्यवर्धन अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे संविधानिक मूल्य शिकविली जातात. तथापि विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसह भारतीय संविधानाची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्यांचे वय विचारात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये याबाबींचा सविस्तर समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण आयुक्त आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सारासार चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rcO1Dl
via IFTTT

Post a Comment

0 Comments