मुंबईतील दोन शाळा देशात टॉप १० मध्ये, आदित्य ठाकरेंनी केलं कौतुक

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूल आणि पूनमनगर सीबीएसई यांचा देशातील टॉप १० सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एज्युकेशन वर्ल्डने १५ व्या इंडिया स्कूल रँकिंग सर्वेक्षण २०२१-२२ मधून देशातील सरकारी शाळांची क्रमवारी जाहीर केली. या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री यांनी शाळांचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी देखील या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. एज्युकेशन वर्ल्ड इंडियाने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या दहामध्ये मुंबईतील दोन शाळांचा समावेश आहे. मुंबई पब्लिक स्कूल आणि पूनमनगर सीबीएसई शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रम राबविले जातात. याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. या उपक्रमांची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या शिक्षण क्षेत्राशी संबंधित वेबसाइटतर्फे देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्षण करुन ही यादी जाहीर केली जाते. शैक्षणिक उत्कृष्टतेच्या १४ मापदंडांवर आधारित संपूर्ण भारतातील ३ हजार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. याअंतर्गत २८ शहरांमधून ११ हजार ४५८ पालक, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारुन अंतिम निष्कर्ष काढण्यात आला. दिल्लीतील शाळा अव्वल दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, सेक्टर १० या शाळेला देशातील सरकारी शाळांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील चार शाळांचा देशातील टॉप १० सरकारी शाळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेल्या इतर तीन शाळांमध्ये राजकीय प्रतिभा विकास विद्यालय सेक्टर ११, रोहिणी, दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, सेक्टर ५, द्वारका, दिल्लीला आठवा क्रमांक मिळाला आहे. राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, यमुना विहार, दिल्ली नवव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीकरांचे कौतुक करत ट्वीटरवर ही माहिती दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HCSDZm
via IFTTT

Post a Comment

0 Comments