दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक कधी? जाणून घ्या...

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन स्वरूपात मार्चमध्ये घेण्याची तयारी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केली जात आहे. या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला असून, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून त्याला मान्यता मिळाल्यास पुढील आठवड्यात दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. मार्च २०२२मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असून, या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मंडळाने परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार करून नुकतेच ते शिक्षण विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. शिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी भूमिका राज्य मंडळाने मांडली आहे. या प्रस्तावानुसार फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा, तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावीच्या परीक्षा घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांचे वेळापत्रक सादर करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकांची सर्व प्रक्रिया फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याने राज्य मंडळाकडून मार्च महिन्यातील तारखांचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. राज्य सरकारने वेळापत्रक मान्य केल्यास दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. 'वेळापत्रक तातडीने जाहीर करा' नोव्हेंबर महिना संपत आला, तरीही दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने तातडीने वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. नोव्हेंबर अखेर वेळापत्रक जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी राहणार आहे. त्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DB0g0b
via IFTTT

Post a Comment

0 Comments