आरोग्य विभाग भरती परीक्षा; १४ परीक्षार्थ्यांचे भवितव्य अंधारात

म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मोहाडी येथील सुदामा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या पेपरचे सेट फुटल्याचा आरोप झाला. चौकशीची मागणी करीत १४ विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला नाही. यावरून वातावरण तापले असताना सोमवारी शासन, प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडल्याचा सूर उमटू लागला आहे. आरोग्य विभागाच्या रिक्तपदांसाठी रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक पेपरचा सेट घेऊन आले. सेट फुटलेला असल्याने काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. पर्यवेक्षकांनी हा प्रकार सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मोहाडीत दाखल झाले. त्यांनी दुसरा पेपर सेट घेऊन परीक्षा देण्याबाबत सांगितले. परंतु, विद्यार्थ्यांचा आक्षेप कायम होता. त्यांनी पेपर न देण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव हेसुद्धा परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यांनी घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर मोहाडी पोलिस निरीक्षक आणि नायब तहसीलदारांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांचे बयान नोंदवून त्यांना परत पाठविले. मुळात, परीक्षा केंद्रावर पेपरचा सेट फुटला कसा, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकारीसुद्धा याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. अधिकाऱ्यांनी शासनाकडे बोट दाखवून याबाबतचा काय तो निर्णय शासन घेईल, अशी भूमिका घेत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या गट 'ड' पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फुटली. ही प्रश्नपत्रिका आठ लाख रुपयांना फुटल्याची आणि त्यानंतर व्हायरल झाल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून संपूर्ण पदभरतीची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, ‘परीक्षेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली,’ अशी भूमिका आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी मांडली आहे. आरोग्य विभागाकडून गट 'क' आणि 'ड' पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाने या परीक्षेची जबाबदारी न्यासा कम्युनिकेशन्स या खासगी आयटी कंपनीला दिली आहे. गेल्या रविवारी २४ ऑक्टोबरला ‘क’ गटाच्या पदांसाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेतही काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि गैरप्रकार झाले. त्यानंतर ‘ड’ गटासाठी रविवारी दुपारी दोन ते चार या वेळेत ही परीक्षा झाली. शनिवारी रात्रीच प्रश्नपत्रिका फुटली आणि रविवारी सकाळी उमेदवारांच्या व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. प्रश्नपत्रिका गठ्ठ्यातून गहाळ होऊ नये, यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्ने आणि त्याची उत्तरे कोऱ्या कागदावर लिहिली होती. या दोन्हींची एकत्रित पीडीएफ सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी व्हायरल झालेली पीडीएफ आणि प्रश्नपत्रिका एकच असल्याची माहिती उमेदवारांनी दिली. पदभरती प्रक्रियेत सामील झालेल्या काही ठराविक उमेदवारांकडून आठ लाख रुपयांना प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फोडण्यात आल्याची माहिती उमेदवारांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ५० प्रश्न एक लाख रुपयांना काही उमेदवारांना देण्यात आल्याची चर्चा आहे. चौकशी आणि पडताळणीमुळे उमेदवार समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. पुण्यासह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांना सील नव्हते. त्यामुळे उमेदवरांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे राज्यातील उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. सत्य समोर येणे गरजेचे आरोग्य भरतीच्या परीक्षेपूर्वी पेपरफुटी झाल्याबाबत सातत्याने उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठीच्या परीक्षा सुरळीत झाल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे चौकशी करण्याबाबत निवेदन दिले आहे. ‘युक्रांद’चे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनीही भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jX9E6y
via IFTTT

Post a Comment

0 Comments