'आरोग्य'च्या पेपर फुटीप्रकरणी आरोग्यमंत्री लक्ष्य

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील पेपर हा सोशल मीडियावरून प्रसारित झाल्याचे वृत्त समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून, यावरून आता राजकीय वादंग उभा राहण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लक्ष्य केले आहे. तसेच न्यासा आणि आरोग्य विभागावर कारवाई होणार की नाही?, असा सवालही मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे गट 'क' आणि 'ड' पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची जबाबदारी 'न्यासा' या खासगी कंपनीकडे देण्यात आली असून, या परीक्षेदरम्यान अनेक गोंधळ झाल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता या परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले असून, यामुळे उमेदवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून, मनसेचे अखिल चित्रे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टि्वटरवरून लक्ष्य केले आहे. 'सरकार, न्यासा चेष्टा करत आहे का? प्रत्येकवेळी पेपर फुटतो हा कसला बेजबाबदारपणा? न्यासा आणि आरोग्य विभागावर कारवाई होणार की नाही?' असे प्रश्न चित्रे यांनी ट्विटरवरून विचारले आहेत. या परीक्षेसाठी सरकार विद्यार्थीहितार्थ निर्णय घेणार की नाही, की ज्यांच्यामुळे पेपर फुटतो त्यांचे कार्यालय फुटण्याची वाट पाहत आहात, असा इशाराही चित्रे यांनी यावेळी दिला. आरोग्य विभागाने या परीक्षेची जबाबदारी न्यासा कम्युनिकेशन्स या खासगी आयटी कंपनीला दिली आहे. गेल्या रविवारी २४ ऑक्टोबरला ‘क’ गटाच्या पदांसाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेतही काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि गैरप्रकार झाले. त्यानंतर ‘ड’ गटासाठी रविवारी दुपारी दोन ते चार या वेळेत ही परीक्षा झाली. शनिवारी रात्रीच प्रश्नपत्रिका फुटली आणि रविवारी सकाळी उमेदवारांच्या व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. प्रश्नपत्रिका गठ्ठ्यातून गहाळ होऊ नये, यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्ने आणि त्याची उत्तरे कोऱ्या कागदावर लिहिली होती. या दोन्हींची एकत्रित पीडीएफ सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी व्हायरल झालेली पीडीएफ आणि प्रश्नपत्रिका एकच असल्याची माहिती उमेदवारांनी दिली. पदभरती प्रक्रियेत सामील झालेल्या काही ठराविक उमेदवारांकडून आठ लाख रुपयांना प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फोडण्यात आल्याची माहिती उमेदवारांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ५० प्रश्न एक लाख रुपयांना काही उमेदवारांना देण्यात आल्याची चर्चा आहे. चौकशी आणि पडताळणीमुळे उमेदवार समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. पुण्यासह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांना सील नव्हते. त्यामुळे उमेदवरांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे राज्यातील उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. सत्य समोर येणे गरजेचे आरोग्य भरतीच्या परीक्षेपूर्वी पेपरफुटी झाल्याबाबत सातत्याने उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठीच्या परीक्षा सुरळीत झाल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे चौकशी करण्याबाबत निवेदन दिले आहे. ‘युक्रांद’चे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनीही भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. सायबर पोलिसांकडे तक्रार ‘आरोग्य भरतीच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांची तक्रार पुणे सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे. एमपीएससी समन्वय समितीतर्फे राहुल कवठेकर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे,’ अशी माहिती कवठेकर यांनी दिली. एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे यांनीही चौकशीची मागणी केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZLop56
via IFTTT

Post a Comment

0 Comments