'सिपेट'मुळे तरुणांना मिळणार प्रशिक्षण आणि रोजगार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण, आणि मिळावा (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग) प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जागेअभावी रद्द झालेला पनवेल येथील प्रकल्प आता नाशिक येथे होणार आहे. प्रकल्पाविषयीची राज्य सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या प्रकल्पामुळे दरवर्षी दोन हजार तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने पनवेल येथे सिपेट प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा एकर जागेची गरज होती. दीड वर्षे उलटूनही सिपेट प्रकल्पाच्या उभारणीसाठी पनवेल येथे जागा उपलब्ध न झाल्याने प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर होता. याची माहिती गोडसे यांना मिळताच त्यांनी पनवेल येथील प्रकल्प राज्याबाहेर न जाता नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोडसे यांनी सिपेटचे प्रमुख झा यांची दिल्लीत भेट घेत पनवेल येथील मंजूर प्रकल्प इतरत्र जाण्याऐवजी तो नाशिक येथेच व्हावा, प्रकल्पासाठी जागा तातडीने उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट करीत रोजगार उपलब्धतेसाठी सिपेट प्रकल्पाची नाशिकला किती गरज आहे, याची सविस्तर माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिली. सिपेट नाशिकलाच व्हावा, यासाठी गोडसे यांनी दिल्लीदरबारी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी केंद्रानेही सिपेटच्या नाशिक येथील प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली होती. गोवर्धन येथील जागेची निश्चिती केंद्राच्या पथकाला नाशिकला पाचारण करून गोवर्धन शिवारातील जागेची निश्चिती चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून निधीचा विषय मार्गी लावण्यात आला. या प्रकल्पासाठी ४० ते ४५ कोटींचा निधी लागणार असून, राज्य आणि केंद्र सरकारने ५०-५० टक्के निधी देण्याचे तत्त्वतः मान्य केले होते. जागा, निधी आणि मान्यता हे तिन्ही मुद्दे एकत्रितपणे सोडविण्यासाठी गोडसे यांच्या मागणीनुसार नुकतीच राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. यात नाशिकमधील गोवर्धन शिवारात सिपेट प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या निधीपैकी पन्नास टक्के निधी राज्य सरकारमार्फत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील आठवड्यात याविषयीचा सविस्तर अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत राज्य सरकारने सिपेट प्रकल्पाला मान्यता देऊन नाशिककरांना दीपावलीची भेट दिली आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BNy48n
via IFTTT

Post a Comment

0 Comments