- सूर्यकांत आसबे, सोलापूर हा सोलापूरच्या मातीत जन्मलेला मनस्वी कलावंत. विपरीत परिस्थितीत शिक्षण थांबले. संगत बिघडली. वाईट वळण पटकन लागले आणि शब्दशहा वाया गेलेला हा तरुण एके दिवशी चांगल्या वाटेवर आला. मुंबईच्या जे जे महाविद्यालयातून पदवी घेतली. चित्रकलेच्या प्रांतात स्वतःचे नाव प्रस्थापित केले. स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला नवी दिशा दाखवली. भावाला आणि बहिणीला शिकवले. कष्टकरी आईला चांगले दिवस दाखवले. जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आणि हा अवलिया स्वतः सारखा प्रतिभावंत हाताला उभारी देत आहे. करोनाच्या महामारीतसुद्धा या अवलिया कलावंताने समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. चित्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्य उभं करणं ही फार खर्चिक आणि जोखमीची गोष्ट आहे. कारण आधी चित्रकलेची पदवी घ्यावी लागते मग स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यासाठी नामांकित आर्ट गॅलरीत प्रदर्शनाचे आयोजन करावे लागते. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवायचे तर दिवसाचे भाडे दहा हजार रुपये आकारले जाते. लाइटचा खर्च वेगळा. तारीख निश्चित करण्यासाठी पाच वर्षे प्रतीक्षा यादीत राहावे लागते .त्यातही चार वर्षांनी संबंधित चित्रकाराला आपली चित्रे सीडीच्या माध्यमातून गॅलरीत पाठवावी लागतात. ती पसंत पडली तरच प्रदर्शनात ती मांडता येतात, असा हा व्याप आहे .सचिन खरात यांनी ही सारी आव्हाने पार करून स्वतःचा ब्रॅण्ड निर्माण केला आहे. कोणताही कलाकार हा मूळचाच संवेदनशील असतो. समाजाच्या वेदनांशी त्याची नाळ जोडलेली असते. समाजातल्या घडामोडींचे तरंग त्याच्या कलेत फक्त उमटतातच असे नाही. तर त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि आचारातही त्याचे प्रतिबिंब उमटत असते. सचिन खरात यांच्या अनेक मित्रांवर विपन्नावस्था आली होती. कित्येकांची भाडी थकली होती. घर मालक तगादा लावत होते. नवीन काम मिळणे सोडाच, परंतु हातात असलेले कामसुद्धा टिकविणे आणि दैनंदिन खर्च भागविणे हेच मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले होते. प्रस्थापितांची ही अवस्था तर नवोदितांचे काय हाल असतील. सचिन खरात त्यांच्यातील संवेदनशील कलावंत ही परिस्थिती पाहून विदीर्ण होऊन गेला. आपण आपल्या लोकांसाठी मित्रांसाठी सहकलाकार यांच्यासाठी राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी करायला हवे ही भावना त्यांच्या मनात प्रबळ होऊ लागली आणि त्यातूनच एक अविष्कार घडत गेला. सचिन खरात यांनी त्यावर एक तोडगा काढत आपली चित्रे त्यांनी निम्म्या किमतीत बाजारात आणली. विक्री किंमतीतून आलेल्या पैशातील १० ते २० टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी तसेच पीएम केअर फंडा देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांची ही संकल्पना लोकांनी उचलून धरली. सचिन खरात यांनी सोलापुरातील काही नवोदित चित्रकारांना दत्तक घेतले आहे. सचिन यांचा चाहता आणि ग्राहक वर्ग मोठा आहे. यात ग्राहक वर्गाच्या माध्यमातून त्यांनी दत्तक घेतलेले चित्रकारांना छोटीमोठी कामे देण्यास सुरुवात केली. महामारी आणि आर्थिक अडचणीच्या काळात ही चित्रकार सचिन खरात आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे स्वावलंबी झाले. त्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. सचिन खरात हे सृजनशील आणि सर्जनशील असे व्यक्तीमत्व आहे. काहीतरी वेगळे आणि भन्नाट करावे हा त्यांचा ध्यास असतो .त्यातूनच एक गुरुकुल बनविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. कलाकारांची संख्या मुळातच कमी आणि त्यातही कलेचे ज्ञान देणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी, ही आजही वस्तुस्थिती आहे .आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून होतकरू कलाकारांना कलेचे ज्ञान द्यायचे हा त्यांचा उद्देश आहे. नृत्य, गायन, चित्रकला, संगीत अशा कलांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. प्राचीन काळातील गुरुकुलाप्रमाणेच या गुरुकुलाची रचना असणार आहे .मोठ्या वृक्षांच्या छायेखाली विद्यार्जन हे त्यांच्या गुरुकुलाचे वैशिष्ट्य असणार आहे .या गुरुकुलातील शिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची निवड सचिन खरात स्वतः करणार आहेत. भव्य सभागृह ,मेडिटेशन हॉल, कलादालन, वाचनालय, संग्रहालय अशी त्या गुरुकुलाची रचना असणार आहे. संग्रहालयात जुन्या व प्राचीन वस्तू पाहायला मिळणार आहेत. सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थी गुरुकुलाचा लाभ घेऊ शकणार आहेत . याच अवलिया सचिन खरात यांनी आता जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क येथे स्पर्श नावाने नवीन स्टुडिओ तयार केला आहे. स्टुडिओ पाहताच क्षणी डोळ्यात भरतो. स्टुडिओत लावण्यात आलेली चित्रे मनाला आनंद देऊन जातात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m2i7Gm
via IFTTT