पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच! फेब्रुवारीत सत्र परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा केंद्रांवरच ऑफलाइन घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला असून, पहिल्या ते तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा नियोजनाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा आदेश देऊनही पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पुणे विद्यापीठाने मात्र शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षांपैकी सर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. पहिल्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ओएमआर शीटच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाल्यास, त्या महाविद्यालयांमधील कॉम्प्युटर लॅबमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने परीक्षा झाल्या, तरी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरच द्याव्या लागणार आहेत. बॅकलॉगच्या परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याबाबत अद्याप नियोजन सुरू असल्याचे सांगितले. परीक्षेच्या नियोजनासाठी विद्यापीठामार्फत एक समिती गठीत करण्यात आली होती. चार अधिष्ठाता व परीक्षा नियंत्रक यांचा या समितीमध्ये समावेश होता. या समितीमार्फत परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, याचा अहवाल तयार करण्यात आला असून, लवकरच विद्यापीठाच्या अधिकार मंडळांकडून त्याला मंजुरी घेतली जाणार आहे. करोनासारख्या आपत्तीच्या काळात ऑनलाइन परीक्षा केवळ पर्याय म्हणून घेण्यात आल्या होत्या. या परीक्षा अनेक समस्यांना कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विरोध असला तरी परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतच विद्यापीठ सकारात्मक असल्याचे या सूत्रांनी सांगितले. परीक्षांचे गांभीर्य संपले गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबतचे गांभीर्य संपले आहे. याबाबत बोलताना परीक्षा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकार, निकालातील घसरलेली गुणवत्ता यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शक्य तितके लवकर पुन्हा परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eoHNc3
via IFTTT

Post a Comment

0 Comments