विद्यार्थी नव्हे..शिक्षकांनीच केल्या बनावट सह्या; पगारासाठी भरविली शाळा

किशोर पाटील | जळगाव विद्यार्थ्यांनी पालकांच्या खोट्या सह्या करुन प्रगतीपुस्तक भरल्याच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील पण शिक्षकांनी कोणाच्या नावाने खोट्या सह्या केल्याचा प्रकार कधी ऐकलाय का? अमळनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यरत जिल्हा परिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांनी चक्क शिक्षण उपसंचालकांची बनावट सही केली आहे. या शिक्षकांनी वेतन मिळवण्यासाठी शाळा भरविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तिन्ही शिक्षक जिल्हा परीषदेच्या शाळेत प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेनंतर शासनाच्या फसवणुकीसाठी केलेल्या बनावट स्वाक्षरीच्या प्रयोगाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. अमळनेर तालुक्यातील कुर्‍हे माध्यमिक विद्यालय येथील प्रयोगशाळा सहाय्यक सुमीत किशोरकुमार वाघ, दोधवद माध्यमिक विद्यालय येथील प्रयोगशाळा सहाय्यक पंकज संतोष शेटे, टाकरखेडा माध्यमिक विद्यालय प्रयोगशाळा सहाय्यक निखिल कल्याण सुर्यवंशी अशी शासनाची फसवणूक करणार्‍या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली आहे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे अधिकारी कर्मचार्‍यांच्या पथकासह गेल्या दोन दिवसांपासून वार्षिक तपासणीसाठी जळगावात आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत उपासनी यांनी दोन दिवसात केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या कामकाजातील त्रुटीबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी शिक्षण विभागातंर्गत २० टेबलावरील कामकाजासह कागदपत्रांची पडताळणी केली. पथकातील शिक्षण उपनिरिक्षक डॉ. किरण कुंवर यांनी तपासलेल्या कागदपत्रांमध्ये अमळनेर तालुक्यातील कुर्‍हे माध्यमिक विद्यालय येथील प्रयोगशाळा सहाय्यक सुमीत किशोरकुमार वाघ, दोधवद माध्यमिक विद्यालय येथील प्रयोगशाळा सहाय्यक पंकज संतोष शेटे, टाकरखेडा माध्यमिक विद्यालय प्रयोगशाळा सहाय्यक निखिल कल्याण सुर्यवंशी या तिघांच्या शालार्थ आयडीतंर्गत वेतनासाठीचे प्रस्ताव आढळून आले. तसेच प्रस्तावरही जावक क्रमांकही नव्हते. तर तिघांच्या प्रस्तावावर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात ही स्वाक्षरी उपासनी यांनी केली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शासनाची फसवणूक केली म्हणून तिघांविरोधात तक्रारीसाठी उपासनी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी त्यांनी पोलीस निरिक्षकांशी चर्चा केली. निरिक्षकांनी सर्व तक्रारींचे दस्ताऐवज आणल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे तक्रार न देताच उपासनी माघारी परतले. वार्षिक तपासणीदरम्यान माझी तिघांनी बनावट स्वाक्षरी करुन वेतनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे बनावट स्वाक्षरीची आणखी प्रकरणे असल्याची शक्यता आहे. याबाबत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yuqHmx
via IFTTT

Post a Comment

0 Comments