वैद्यकीय प्राध्यापक सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

म.टा. विशेष प्रतिनिधी | नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील अस्थायी प्राध्यापकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे आमच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या न झाल्यास येत्या १५ जानेवारीपासून आम्ही पदव्युत्तर मार्गदर्शक पदाचे देऊ, अशा इशारा महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनने दिला आहे. सेवेत नियमित करावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी वैद्यकीय प्राध्यापकांनी २० डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. यासंबंधात मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना निवेदन देताना उपरोक्त इशारा देण्यात आला. राज्यात जवळपास पाचशेहून अधिक अस्थायी सहायक प्राध्यापक करोनासारख्या महामारीतही अहोरात्र सेवा देत आले आहेत. नोव्हेंबर २०२०मध्येही या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी त्यांना सेवा नियमित करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याकडे लक्ष न दिल्याने करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांनी, आठ दिवसांत सेवा नियमित करण्याचे आश्वासन दिले. या आठ दिवसांचे आठ महिने झाले तरी हे प्राध्यापक अजून सेवेत नियमित झाले नाहीत. अस्थायी असतानाही करोना लाटेत आम्ही घरदार विसरून अहोरात्र रुग्णसेवा केली. मात्र, त्याचा शासनाला विसर पडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या अध्यापकांना अनुज्ञेय सर्व भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनानुसार देण्यात यावे, सरळ सेवा भरतीमध्ये असलेली उच्च वयोमर्यादेची अट रद्द करावी, अधिष्ठाता, सहसंचालक, संचालक या पदांसाठी अनुक्रमे १० वर्षे, ५ वर्षे व ३ वर्षे याप्रमाणे कालमर्यादा निश्चित करावी. असे झाल्यास इतर अनुभवी प्राध्यापकांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळेल, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्यात येतील, असे संघटनेचे सरचिटणीस डॉ. समीर गोलावार यांनी म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30XZY5q
via IFTTT

Post a Comment

0 Comments