RTE Admission 2022: पुढील वर्षाच्या प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षण हक्क कायद्यां'तर्गत () देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबरपासून राज्यातील 'आरटीई'अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. १७ जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून, त्यानंतर 'आरटीई' प्रवेशांसाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना 'आरटीई' प्रवेशांसाठी अर्ज करता येणार आहेत. आठ किंवा नऊ मार्चला 'आरटीई' प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. 'आरटीई'च्या सोडतीत नाव लागलेल्या पालकांना १० मार्च ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेशनिश्चिती करता येईल. एक एप्रिलपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशफेऱ्या सुरू होणार आहेत. यंदाचे संभाव्य वेळापत्रक पाहता मे महिन्यातच 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया पाहता शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाच्याच कालावधीत ती पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेही यंदाही 'आरटीई' प्रवेशांची सोडत एकदाच जाहीर केली जाणार असून, शाळांमधील प्रवेशांच्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 'आरटीई' प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक प्रवेशांच्या जागांची पुनर्तपासणी २८ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ ... ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत एक फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ ... आरटीई प्रवेशांसाठी सोडत आठ किंवा नऊ मार्च २०२२ प्रवेश निश्चित करण्याची मुदत १० मार्च ते ३१ मार्च २०२२ .... प्रतीक्षा यादीतील पहिली प्रवेश फेरी एक एप्रिल ते ७ एप्रिल २०२२ .... प्रतीक्षा यादीतील दुसरी प्रवेश फेरी ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ प्रतीक्षा यादीतील तिसरी प्रवेश फेरी २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२ ... प्रतीक्षा यादीतील चौथी प्रवेश फेरी दोन मे ते ९ मे २०२२ ... आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २८ डिसेंबर पासून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहोत. राज्यातील पालकांनी याची नोंद घ्यावी. - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री. घटत्या प्रवेशसंख्येचे काय करणार? गेल्या काही वर्षांपासून आरटीई प्रवेशांसाठी उपलब्ध जागांमध्ये वारंवार घट होत आहे. २०२१-२२ मध्ये केवळ ९६ हजार जागा उपलब्ध होत्या. तत्पूर्वी, एक लाख जागा उपलब्ध होत्या. या घटत्या जागांचे काय करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याशिवाय २०२१-२२मध्ये दोन लाखांहून अधिक अर्ज येऊनही राज्यात प्रवेशांच्या तीस हजार जागा का रिक्त राहिल्या, याचेही उत्तर शिक्षण विभागाकडून मिळणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30YuiNe
via IFTTT

Post a Comment

0 Comments