मातृभाषेतून इंजिनीअरिंग शिक्षणाच्या AICTE च्या उपक्रमाला अल्प प्रतिसाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मातृभाषेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या उपक्रमाला पहिल्या वर्षी अल्प प्रतिसाद मिळाला. यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांपैकी २१ टक्के जागांवर प्रवेश झाला असून मराठी भाषेसाठी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून आठ भारतीय भाषांमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तमिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. यानुसार देशात १९ कॉलेजांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शविली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये देशभरातील १ हजार २३० जागांपैकी २५५ जागा भरल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मराठी भाषेच्या ६० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्या खालोखाल तामिळमध्ये ५०, बंगालीमध्ये १६, तेलगु भाषेसाठी १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कानडी भाषेतील अभ्यासक्रमासाठी एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश होऊ शकला नाही. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. मातृभाषेतून शालेय शिक्षण झाल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण समजत नाही. ते त्यांना सोपे जावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी अधोरेखित केले. या भाषेत अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध होतील की नाही, शिक्षण नेमके कसे होईल, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होते. आम्ही आत्ता विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. तसेच हे विद्यार्थी परीक्षाही मराठीत देऊ शकणार आहेत, असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले. जपान, कोरिया आदी देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेत पदवी शिक्षण दिले जाते. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संज्ञा इंग्रजीतूनच शिकविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोठेच अडत नाही. उलट हे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास समजू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबाबत जशी जागरुकता निर्माण होईल, तसे प्रवेश वाढतील, असेही ते म्हणाले. याचबरोबर आता गुजराती, ओरिया आणि पंजाबी या भाषांमध्येही कॉलेज सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव आमच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tBQsAT
via IFTTT

Post a Comment

0 Comments