बोर्डीच्या शाळेत शिकलेल्या मिराजची 'इस्रो'भरारी! सायंटिस्ट इंजिनीअर म्हणून नियुक्ती

म. टा. वृत्तसेवा, डहाणू डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील आचार्य भिसे विद्यानागरीत गोखले एज्युकेशन सोसायटीचा माजी विद्यार्थी मिराज अन्सारी हा तिरुअनंततपुरमच्या इस्रो येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे शास्त्रज्ञ म्हणून एप्रिल २०२१मध्ये रुजू झाला. त्याने नुकतीच बोर्डीतील या शैक्षणिक संस्थेला भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्डीतील आचार्य भिसे विद्यानगरीत मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतील शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने गुजरात राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मिराज अन्सारी यांचे वडील शौकत अली अन्सारी हे सीमेलगतच्या गुजरात येथील उंबरगावला टेलिफोन एक्सेंज येथे लाइनमन म्हणून कार्यरत होते. त्यावेळी मिराज अन्सारी याने बोर्डी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चित्रे गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे प्रवेश घेतला आणि २०११मध्ये दहावी उत्तीर्ण केली. याच संस्थेच्या पी. जी. ज्युनिअर कॉलेजातून २०१३मध्ये संगणक शाखेतून बारावी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यानंतर २०१७मध्ये पुणे विद्यापीठात मॅकेनिकल इंजिनीअरिंगमधून बी. ई. चे शिक्षण पूर्ण केले. २०२०मध्ये एनआयटी नागपूर येथून इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग या विषयात एम.टेक ही पदवी प्राप्त केली. एप्रिल २०२१पासून सायंटिस्ट इंजिनीअर या पदावर इस्रोमध्ये तिरुवनंतपुरम येथे कार्यरत आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने शनिवारी बोर्डीतील या शैक्षणिक संस्थेला भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्याध्यापिका वीणा माच्छी व अन्य शिक्षकांनी त्याचे पुष्प देऊन स्वागत केले. त्याचा आदर्श अन्य ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढून शिक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कठोर परिश्रम करून सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्याने पालक, शाळा आणि परिसराचे नाव मोठे केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JZ7GO3
via IFTTT

Post a Comment

0 Comments