पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांवर 'असा राहणार वॉच'

म. टा. प्रतिनिधी, पुणे ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेऊन कॉपी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 'वॉच' ठेवला जाणार आहे. यंदा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून, यात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठाची यंदाची सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने, त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या (एमसीक्यू) असणार आहेत. या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 'प्रॉक्टर्ड' पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. आता त्यात आणखी काही कडक नियम लागू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील, तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षांबाबतीत अधिक सतर्कता बाळगण्यात येणार असल्याने यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कसून तयारी करावीच लागणार आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आता परीक्षा विभागाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कशाप्रकारे गैरप्रकार करू शकतात, याबाबत सर्व माहिती विभागाकडे आहे. नेमक्या त्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार असल्याने कॉपी करणाऱ्यांना यंदा घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांनी जर ऑनलाइन परीक्षा देण्याची मागणी केली, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या वेळी विद्यापीठाच्या सहा अंध विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही परीक्षा देऊन पाहिली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या वेळेलाही अंध विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑडिओद्वारे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी स्वत:च्या आवाजात उत्तरांचे पर्यात देतात आणि ते उत्तर रेकॉर्ड केले जाते. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला आता ऑनलाइन परीक्षांचा अनुभव आला आहे. यामुळे यंदाच्या परीक्षांमध्ये फारशा अडचणी येणार नाहीत. यंदा विद्यार्थ्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्याची पडताळणी करून, दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल. परीक्षा अत्यंत पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ ऑनलाइन परीक्षांमध्ये यापूर्वी झालेली कारवाई - जवळपास १८०० विद्यार्थी कॉपी करताना सापडले. - यामधील ६० टक्के म्हणजेच १२००पेक्षा अधिक विद्यार्थी इंजिनीअरिंगचे होते. - ६०० विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेतील. - कॉपीसाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा दंड. - विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक पेपरमध्ये गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संपूर्ण परीक्षा रद्द.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://bit.ly/3rb6obw
via IFTTT

Post a Comment

0 Comments