शैक्षणिक सहलींना यंदाही पूर्णविराम; ओमायक्रॉनमुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, जव्हार दीड वर्षांपासून शाळा-कॉलेजां करोनासाथीमुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष घरीच ऑनलाइन माध्यमातून पूर्ण झाले आहे. पहिली ते चौथी, त्याचबरोबर पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शाळा करोना ओसरल्यानंतर सुरू झाल्या होत्या. पण त्याही आता बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यंदाही ओमायक्रॉनच्या भीतीमुळे शैक्षणिक सहलींना पूर्णविराम देण्यात आला आहे. शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नवी ऊर्जा मिळावी म्हणून त्यांच्यासाठी क्षेत्रभेटी तसेच निसर्गरम्य ठिकाणे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे आदी ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट घोंघावत असल्यामुळे शाळा-कॉलेजे बंद करण्यात आली होती. मुलांनी घरी राहूनच ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्ष पूर्ण केले. आता शाळा सुरू झाल्या असल्या, तरी ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता बाळगली जात आहे. एक ते दीड वर्षांपासून घरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा सहलीच्या आनंद करोनामुळे हिरावला गेला होता. मात्र, आता चार ते पाच महिन्यांपासून करोनाचा जोर ओसरल्यामुळे शाळांच्या बरोबरच सहलीही सुरू होतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. परंतु राज्यात वाढत चाललेल्या ओमायक्रॉनच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडले आहे. शाळा-कॉलेजांच्या स्तरावर विविध शैक्षणिक व अभ्यास सहलींचे आयोजन केले जाते. सहलीत क्षेत्र भेटीसह मौजमजा व निसर्गरम्य ठिकाणी भेटी दिल्या जातात. निसर्ग पर्यटनामधून पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. साधारणपणे दुसऱ्या सत्रात डिसेंबर-जानेवारी महिन्यांमध्ये या सहली होत असतात. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत चाललेल्या धोक्यामुळे यंदाही थांबल्याच आहेत. त्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित असे कोणतेच संकेत दिलेले नाहीत. पर्यटनस्थळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा तालुक्यातील शाळांच्या सहलींसाठी धार्मिक, नैसर्गिक व पौराणिक स्थळे प्राधान्याने निवडली जातात. सहल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण विभागाकडून यंदा कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सध्या तरी ओमायक्रॉनमुळे सहलींना परवानगी दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा करोना संसर्ग आटोक्यात आला, तरी सहली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वाट पहावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qPDSL9
via IFTTT

Post a Comment

0 Comments