पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १४.२० टक्के विद्यार्थी पात्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये पाचवीचे १६.९९ टक्के आणि आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. एकूण निकालाकडे पाहिल्यास शिष्यवृत्तीसाठी १४.२० टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षांसाठीचा अंतरिम निकाल २४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर महिना होऊनही अंतिम निकाल जाहीर होत नसल्याने राज्यातील पालक, आणि विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी परिषदेच्या वेबसाइटवरून माहितीची चोरी होऊन गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या याद्या समाजमाध्यमांत फिरत असल्याचेही निदर्शनास आले होते. यामुळे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यास बराच विलंब केला जात होता. अखेर शुक्रवारी परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा पाचवीच्या तीन लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख ३७ हजार ३७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून ५७ हजार ३३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, १४ हजार २५० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ४४ हजार ३१४ विद्यार्थ्यांपैकी दोन लाख १० हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातून पात्र ठरलेल्या २३ हजार ९६२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ७३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये मिळून २४ हजार ९८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. येथे पाहता येणार निकाल पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना https://ift.tt/3F8iR3B ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकद्वारे विद्यार्थी आणि पालक निकाल पाहू शकतील, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qSc9ta
via IFTTT

Post a Comment

0 Comments