राज्यातील १० मेडिकल कॉलेजांमधील प्रवेश स्थगित; काय कारण... वाचा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नाशिक राज्यातील दहा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमधील प्रवेशप्रक्रिया (MBBS Admission 2022) प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) थांबविण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची (MUHS) संलग्नता मिळालेली नसल्यामुळे हे प्रवेश थांबवण्यात आले आहेत. या कॉलेजांमध्ये ६७० जागा असून, संलग्नता सादर केल्यानंतरच त्या जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे कक्षामार्फत सांगण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राज्यातील वैद्यकीय कॉलेजांमध्ये सध्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यातील दहा कॉलेजांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळालेली नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे या कॉलेजांतील ६७० जागांवरील प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीदरम्यान राबविण्यात आलेली नसल्याचे प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सांगण्यात आले; तसेच संलग्नता मिळाल्यानंतर पुढील प्रवेश फेरीत या जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रक्रियेत, कॉलेजात प्रवेश देण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाची केंद्रीय परिषद, महाराष्ट्र सरकार व यांची परवानगी आवश्यक असते. नोंदणीच्या टप्प्यापर्यंत राज्यभरातील जागा दर्शविताना केंद्रीय परिषद, महाराष्ट्र सरकार यांची परवानगी असलेल्या कॉलेजांतील जागा दर्शविल्या जातात. परंतु, विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्याशिवाय कॉलेजातील विद्यार्थी निवड केली जात नाही. राज्यातील कॉलेजांना आरोग्य विद्यापीठाकडे दर वर्षी आपल्या संलग्नतेचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे ही संलग्ता मिळाली तरच या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ...... संलग्नता अद्याप प्रक्रियेत याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संपर्क साधला असता, संलग्नेतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील १० कॉलेजांपैकी चार कॉलेजांना नुकतीच संलग्नता देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, अन्य कॉलेजांच्या संलग्नतेचे काम विद्यापीठाच्या नियोजन मंडळाकडे आहे. कॉलेजातील वाढीव जागा, नवीन कॉलेज याबाबतच्या कामामुळे ही संलग्नतेची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WkxfoLOdV
via IFTTT

Post a Comment

0 Comments