Also visit www.atgnews.com
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची शुल्कवाढ सुरूच
पुणे : विद्यार्थी आणि पालकांना करोनामुळे आर्थिक झळ सोसावी लागत असताना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी () एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी () सलग दोन वर्षे ८ ते १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे. ही शुल्कवाढ ताजी असतांनाच शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा नव्याने शुल्कवाढ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच डॉक्टर्स क्लब, कॉशन मनीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय पदवी शिक्षणाचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर नेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET CEll) एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत आहे. खासगी महाविद्यालयांचे शुल्क पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्याबाबत पुनर्विचार करावा लागत आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी राबविण्यात येत असल्याने, कागदपत्रांपेक्षा शुल्काची रक्कम जमा करताना तजवीज करावी लागत आहे. राज्यात १९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यातील दोन नवीन आहेत. त्यामध्ये दोन हजार ७२० जागा आहेत. त्यातील तीन महाविद्यालये वगळता सर्व महाविद्यालयांनी शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे सध्याचे वार्षिक शैक्षणिक शुल्क (शुल्क + विकास शुल्क) सहा लाख ते साडेसोळा लाख या दरम्यान झाले आहे. राज्यात सलग दोन वर्षे करोनाचा प्रादुर्भाव असल्याने शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक शुल्कात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार राज्यातील काही शाळा आणि महाविद्यालयांनी शुल्कवाढ केली नाही, तर काहींनी शुल्क कमी केले. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणारे खासगी महाविद्यालयांनी याउलट दर वर्षी आठ ते १० टक्क्यांनी शुल्क वाढविले आहे. शिक्षण मंत्रालय आणि 'एफआरए'चे नियंत्रण नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयांनी आगामी २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ करण्याची शक्यता आहे. 'एफआरए'ने शुल्कवाढ करण्याबाबत महाविद्यालयांना प्रस्ताव मागितले असून, त्याअंतर्गत पुन्हा शुल्कवाढ होणार आहे. अशा परिस्थितीत या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची; तसेच शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे. कॉशन मनी, क्लब फी दोन लाख रुपये राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कॉशन मनी, डॉक्टर्स क्लब अशा उपक्रमांच्या नावाखाली एक ते दोन लाख रुपये शुल्काच्या व्यतिरिक्त उकळण्यात येत आहेत. त्यामुळे हा अतिरिक्त भुर्दंड विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागत आहे. पूर्ण शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नसल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे बेकायदा शुल्कवसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर कॅपिटेशन फी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी आरक्षण हक्क संरक्षण समितीचे निमंत्रक डॉ. संजय दाभाडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक यांच्याकडे केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eDQ1Jj9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments