पालिका शाळांची ऑनलाइनची सक्ती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मात्र एक अजब निर्णय घेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कामाला लावले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत प्रत्येक शाळेने दररोज किमान चार तासिकांचे नियमित वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन-अध्ययन करून त्यांचे मूल्यमापन करावे असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाला शिक्षकांकडून विरोध करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने हे परिपत्रक जरी केले आहे. शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी मोबाइल व ऑनलाइन माध्यमातून संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे शिक्षक, मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाइलमध्ये टेलिग्राम अॅप डाउनलोड करून इयत्तानिहाय समूहांमध्ये सहभागी व्हावे, त्यातील शैक्षणिक माहिती व आवश्यक अन्य सूचनांकरिता mcgmedu हे चॅनल सबस्क्रॅब किंवा सुरू करण्यास सांगितले आहे. शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्यास सांगितले आहे. रोज चार तासिकांचे वेळापत्रक तयार करून शिक्षकांनी पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना अभ्यास सामग्री पाठवायची आहे, त्यानंतर त्याचे ऑनलाइन पद्धतीने मूल्यमापन करायचे आहे. शिक्षक आपली ही जबाबदारी योग्यपणे पार पाडत आहे का त्यावर मुख्याध्यापकांनी नजर ठेवायची आहे. शिक्षकांनी रोज चार तास यूट्युब किंवा फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावरून सर्व सामग्री डाउनलोड करून प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांना पाठवायचे आहे आणि ते विद्यार्थ्यांकडून पुन्हा मागवून तपासून त्याला गुण द्यायचे आहेत. झूम अॅपच्या माध्यमातून शिक्षकांनी पालकांसोबत तसेच शिक्षकांनी मुख्याध्यापकसोबत बैठक घ्यायची आहे. शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहाणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी विसरावी लागणार आहे. दरम्यान, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार पहिली ते आठवीच्या प्रथम सत्र अंतर्गत मूल्यमापनातील गुणांच्या आधारे मूल्यांकन करून वार्षिक निकाल तयार करून तो व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातून जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सक्ती कशासाठी? मनपा शाळेत किंवा खासगी अनुदानित शाळेत शिकणारी नव्वद टक्के मुले ही झोपडपट्टीत राहाणारी आहेत. अनेक पालकांकडे अॅड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. बाहेर मोबाइल रीचार्ज मिळत नसल्याने अनेकांचे मोबाइल बंद झाले आहेत. मुंबईत अतिशय भयाचे वातावरण आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकून झालेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान अजिबात झालेले नाही. करोनाच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या कालावधीत पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपण शिकवायला सांगत आहात. हे मानसशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे. केवळ शिकवणच नाही तर त्याचे लिंकद्वारे मूल्यमापनही घेण्याच्या सूचना त्याहूनही गंभीर आहेत. हे परिपत्रक मागे घेण्याची गरज आहे. - जालिंदर सरोदे - प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S2JmBN
via IFTTT

Post a Comment

0 Comments