आयआयटीचे माजी विद्यार्थी उभारणार करोनासाठी मेगालॅब

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यासाठी आयआयटी मुंबई एक मेगालॅब उभारणार आहे. या प्रयोगशाळेत करोना निदानासाठी दर महिन्याला १ कोटी चाचण्या केल्या जाणार आहेत. मेगालॅबच्या माध्यमातून करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि इतर संसर्गजन्य आजारामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या लॅबला मुंबई विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. करोना आणि इतर संसर्गजन्य आजारापासून संक्रमित झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी मुंबईत उभी करण्यात येणारी मेगालॅब ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणार असून जागतिक दर्जाच्या आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी ही लॅब उभारली जाणार आहे. यासाठी माजी विद्यार्थी संघाने मुंबई विद्यापीठाची निवड केली आहे. याअनुषंगाने या मेगालॅब प्रकल्पासाठी मुंबई विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधन पायाभूत सुविधा या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाची मोठी भूमिका असणार आहे. गुणवत्तेवर भर मुंबई शहरातील संपूर्ण लोकसंख्येची करोनासह इतर संसर्ग आजारांची तपासणी करण्याची क्षमता निर्माण करणारी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत सुविधांनी युक्त ही लॅब असेल, असे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले. देशातील सर्वात जुन्या आणि अग्रणी मुंबई विद्यापीठाचे मेगालॅबच्या उभारणीत सहकार्य लाभणे हे पहिल्यांदाच होत असून यासाठी प्रथमच आयआयटी माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेतला आहे. या सहकार्यामुळे मेगालॅब तपासणीची गुणवत्ता, सातत्य आणि गती यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. १६३ वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक गुणवत्ता जोपासणारे मुंबई विद्यापीठ विविध संशोधन क्षेत्रात अग्रेसर विद्यापीठ आहे. बायोटेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील बायोसायन्सेस संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने भरीव कामगिरी केली आहे. त्यातीलच पुढील टप्पा म्हणून आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेसोबत भागीदारी करुन मॉलेक्युलर डॉयग्नोस्टिक आणि जेनेटिक टेस्टिंगकरीता जगातील सर्वात मोठ्या मेगालॅबसाठी विद्यापीठ पुढे येत असून याद्वारे १ कोटी चाचण्या या दर महिन्याला होऊ शकतील हे अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. या लॅबच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान आणि निर्माण झालेली माहिती कोव्हिड -१९ चा प्रतिबंध आणि उपचारांबरोबरच क्षयरोगांसारख्या इतर रोगांबाबत उपाय शोधण्यात मोलाची ठरेल, असे मुंबई विद्यापीठाचे इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gvxKBX
via IFTTT

Post a Comment

0 Comments