NEET UG 2021: भौतिकच्या उत्तरतालिकेला आव्हान देणारी याचिका SC ने फेटाळली

Result: नीट परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाच्या दुरुस्तीसंबंधी काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या याचिकेवर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा किंवा नीट निकाल २०२१ हे राष्ट्रीय चाचणी एजन्सी किंवा NTA द्वारे १ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. मात्र यामध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरतालिकेला काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नीट यूजी परीक्षेला बसलेल्या २२ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, भौतिकशास्त्र विभागात दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नात विचारलेल्या प्रश्नाचं हिंदी भाषांतर चुकीचं होतं. प्रश्नाच्या हिंदी भाषांतरात‘amplitude of current’ चा उल्लेख नव्हता, हा उल्लेख मूळ इंग्रजी प्रश्नात होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी प्रश्न वाचून उत्तर दिलं, त्यांचं उत्तर चुकलं, कारण प्रश्नाचं भाषांतरच चुकीचं होतं. याचिकेत म्हटलं आहे की NTA च्या या चुकीमुळे हिन्दीभाषी विद्यार्थ्यांचं गुण आणि रँकचं नुकसान होत आहे. मात्र NTA चा नियम असं म्हणतो की NEET परीक्षेत कोणत्याही प्रश्नाचा अनुवाद नीट कळला नसेल वा अस्पष्ट असेल तर त्या प्रश्नाचं इंग्रजी व्हर्जन अंतिम मानलं जाईल. यासंबंधी एनटीएचा निर्णय अंतिम असेल. तीन स्वतंत्र तज्ज्ञांच्या पॅनेलचे मत विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय चाचणी एजन्सी, NTA ने स्थापन केलेल्या पॅनेलमध्ये आयआयटी, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील प्राध्यापकांचा समावेश होता. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही आवृत्त्यांसाठी उत्तरे सारखीच असावीत अशी शिफारस पॅनेलने केली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नमूद केले की, आम्ही इंग्रजी किंवा हिंदीत लिहिले तरी उत्तर एकच राहणार आहे. यावर तिघांची सहमती झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भौतिकशास्त्राच्या परीक्षेतील एका प्रश्नाच्या मूल्यांकनासाठी तीन विषयतज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली. अशी समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. या समितीने संबंधित प्रश्नाचे मूल्यांकन केले. समितीच्या शिफारशीनुसार कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. या प्रकरणी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की आम्हाला भौतिकशास्त्र विषयाबाबत काहीच माहिती नाही. तज्ज्ञ समितीमार्फत याचा अभ्यास होईल तर अधिक चांगलं होईल. हे तज्ज्ञ असे असावेत ज्यांना वैज्ञानिक परिभाषा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये येत असेल. सुनावणीदरम्यान, महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले की जी समिती आधीपासूनच गठित करण्यात आली आहे, त्याव्यतिरिक्त आणखी एक समिती स्थापन केली जाईल. नीट २०२१ मध्ये विचारलेल्या भौतिकशास्त्राच्या एका प्रश्नासंबंधी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)ने नीट २०२१ मध्ये विचारलेल्या भौतिकशास्त्रातील प्रश्नाला हटवून पुन्हा निकाल जाहीर करावा असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला हे अपील केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d4Dh1B
via IFTTT

Post a Comment

0 Comments