१५ जूनपासून शाळा भरणार; पण 'अशा'...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे गेले दोन महिने बंद असलेल्या शाळा १५ जूननंतर सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्याचे समजते. मात्र, यात शाळा भरणार नसून, शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शिक्षण आयुक्तांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले आहे. करोनाच्या काळात जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष नक्की कधी सुरू होईल याबाबत साशंककता होती. यातच १५ जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र, या शाळा सुरू करण्याचा आग्रह नसून, शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याचा विचार करून आम्ही ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा विचार करता आहोत. यात दूरचित्रवाणी, रेडिओ, स्थानिक केबलचालक आदींशी संपर्क साधून कशा प्रकारे शैक्षणिक व्हिडीओ प्रसारित करता येईल याबाबत आम्ही विचार करत असल्याचे सालंकी यांनी स्पष्ट केले. इंटरनेट नाही अशा ठिकाणी मोबाइलवरून वर्ग भरवण्याची तयारी सुरू १५ जूनपासून शाळा सुरू होणार का? याबाबत विचारले असता ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करणे शक्य आहे का? याबाबत सरकारचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र, राज्यात अनेक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे. यामुळे शाळा लवकर सुरू करणे अवघड असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तर मुंबईतही शाळा इतक्यात सुरू करणे अवघड असल्याचे चित्र आहे. तर काही शाळांनी ज्या भागात इंटरनेट नाही अशा ठिकाणी मोबाइलवरून वर्ग भरवण्याची तयारी सुरू केली आहे. गावाला गलेल्या विद्यार्थ्यांना फोनवरून अध्ययन सुरू करण्याचा विचारही सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. आरोग्य, स्वच्छतेची काळजी अत्यावश्यक शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक, तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे, तसेच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिक्षण विभागाला दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढील काळात ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाचे पर्यायसुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून, शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणे, दर दिवशी एक वर्ग भरविणे असे पर्यायही अजमावून पाहण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावे, ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा व यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AfOCM4
via IFTTT

Post a Comment

0 Comments