पुणे विद्यापीठ उभारणार सॅटेलाइट केंद्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतील संलग्‍न महाविद्यालयांकडून सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात उत्तम उच्चशिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांना २०२१-२२ शैक्षणिक वर्षामध्ये सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याबाबत राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाने कार्यवाही केली आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न इच्छुक महाविद्यालयांना सॅटेलाइट केंद्रसाठीचे प्रस्ताव विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरुन भरून सक्षम अधिकार्‍याच्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी आवश्यक त्या कागदपत्रांसह येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाकडे जमा करायचे आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक शैक्षणिक विभागाकडून सोमवारी प्रकाशित करण्यात आले आहे. सॅटेलाइट केंद्रात कौशल्य अभ्यासक्रम, दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान यंत्रणेची उपलब्धता यावर भर देण्यात आला आहे. महाविद्यालयाचे सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक संस्थांना प्रस्तावासह केंद्राचा पंचवार्षिक आढावा अहवाल, त्या परिसरात सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याच्या गरजेचा सर्वेक्षण अहवालही सादर करावा लागेल; तसेच प्रस्तावित अभ्यासक्रम, आवश्यक प्रयोगशाळा, पुस्तके उपलब्ध करण्याबाबतचे नियम विद्यापीठांना तयार करावे लागणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेयांक पद्धतीचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम या केंद्रात राबवले जातील. महाविद्यालयाच्या मुख्य केंद्रापासून दोनशे किलोमीटरच्या परिसरात केंद्राची स्थापना करता येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा तीनशे किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. मात्र, विद्यापीठाच्या कार्यकक्षेबाहेर केंद्राची स्थापना करता येणार नाही. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर, केंद्र स्थापन करायचे असल्यास त्या परिसरातील विद्यापीठाची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. प्रस्तावित सॅटेलाइट केंद्रापासून पंधरा किलोमीटरच्या परिसरात त्या अभ्यासक्रमाचे दुसरे महाविद्यालय असता कामा नये, असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला एका महाविद्यालयाला एकच सॅटेलाइट केंद्र सुरू करता येईल. तीन वर्षे यशस्वीरीत्या केंद्र चालवल्यानंतर वाढीव सॅटेलाइट केंद्राचा प्रस्ताव सादर करता येईल. केंद्राच्या संलग्नीकरणाचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे लागणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. गुणवत्ता असणाऱ्या महाविद्यालयांना संधी सॅटेलाइट केंद्रासाठी सरसकट सर्व महाविद्यालयांना प्रस्ताव दाखल करता येणार नाही. तर नॅक, एनबीए या संस्थांचे मानांकन असणारे महाविद्यालये प्रस्ताव सादर करू शकतील; तसेच पुनर्मूल्यांकन करुन न घेतलेल्या, महाविद्यालय स्थापनेला १० वर्षांपेक्षा कमी कालावधी झालेल्या आणि सॅटेलाइट केंद्राचे ठिकाण ग्रामीण, आदिवासी भागात नसलेल्या महाविद्यालयांनी सॅटेलाइट केंद्रासाठी अर्ज न करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3393F6p
via IFTTT

Post a Comment

0 Comments