रखडलेले अकरावी प्रवेश: पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे हे गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची भेट घेतली. कोचिंग क्लासेसच्या चालक-शिक्षकांचे शिष्टमंडळही यावेळी पालकांसोबत होते. राज्यातील शिक्षण क्षेत्रावर आधीच करोनामुळे यावर्षी संक्रांत आलेली होती. दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडले होते. ते विलंबाने लागले. मात्र त्यानंतरही अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांपुढचे दुष्टचक्र संपेना. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि अर्ध्यातच थांबली. मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया पुढे जात नाहीए. परिणामी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच कोचिंग क्लासचालकांनी कोचिंग क्लासेस त्वरीत सुरू करण्याबाबत निर्णय व्हावा यासाठी राज यांना साकडे घातले. काही पालकांनी यावेळी शाळांच्या शुल्कवाढीचाही मुद्दा ठाकरे यांच्यासमोर मांडला. राज्य सरकारने फीवाढ न करण्यासंदर्भातला जीआर जारी केल्यानंतरही काही शाळांनी फीवाढ केल्याची बाब पालकांनी निदर्शनास आणून दिली. राज ठाकरे यांनी पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. ते म्हणाले, 'आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?' यापूर्वी कोळी महिला, जिम चालक, मूर्तीकारांनीही राज यांची भेट घेतली होती. दरम्यान, राज्यातील वीजेच्या प्रश्नावरून राज यांनी मागील आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HVmK41
via IFTTT

Post a Comment

0 Comments