विद्यापीठ परीक्षांमध्ये सावळागोंधळ; मित्र सोडवतात पेपर!

म. टा. वृत्तसेवा, कल्याण : करोनाकाळात एकीकडे राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घोषित केलेल्या असताना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टर परीक्षा मात्र ऑनलाइन घेतल्या जात आहेत. त्यातच या परीक्षार्थींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने परीक्षा म्हणजे खेळ सुरू असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांकडून केला जात आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर कोणतेही बंधन आणि नियम नसल्याने शिक्षक व्यथित झाले आहेत. या परीक्षांना कोणताही अर्थ नसून स्पर्धेत टिकण्यासाठी या मुलांना अतिशय संघर्ष करावा लागण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. सध्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर परीक्षा राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू आहेत. प्रत्येक शहरातील महाविद्यालयाचे क्लस्टर करत एका ठिकाणाहून शहरातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षांचे नियोजन केले जाते. त्या महाविद्यालयाकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, यावर या परीक्षार्थींवरील नियंत्रण अवलंबून आहे. करोना साथरोग प्रतिबंधक नियमानुसार करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या परीक्षा ऑफलाइन घेण्याचे निर्देश असले तरी या परीक्षांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात आहे. या परीक्षेसाठी पर्यायात्मक पद्धतीने २०० प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली असून यातील ५० प्रश्न विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नपत्रिकेत दिले जातात. सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते. परीक्षा क्रमांक टाकून ही प्रश्नपत्रिका मोबाइल, लॅपटॉप, संगणक कुठेही ओपन होते. प्रत्यक्षात पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा कालावधी असला तरी लिंक तीन ते साडेतीन तास ओपन असते. याचा फायदा घेत विद्यार्थी एकत्र बसून पेपर सोडवतात किंवा एका विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका पहिल्या टप्प्यात सर्व विद्यार्थी मिळवून सोडवतात आणि त्यानंतर हीच उत्तरपत्रिका इतर विद्यार्थी कॉपी करत असल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांनी दिली. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास विद्यार्थी शिक्षकांना फोन करून किंवा इंटरनेटचा वापर करून उत्तर शोधतात. त्यातच उपलब्ध पर्यायदेखील अंतिम परीक्षेच्या योग्यतेचे नसल्याचे शिक्षकाचे म्हणणे आहे. काही शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मित्राला आपला परीक्षा क्रमांक देत त्याला पेपर सोडविण्यास सांगून विद्यार्थी फिरण्यासाठी निघून जात असून शिक्षकांना हे उघडपणे सांगताना विद्यार्थ्यांना संकोच वाटत नाही. यामुळे परीक्षा नेमकी विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी आहे का, असा सवाल करत शिक्षकांनी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनादेखील परीक्षेचे स्वरूप कळलेले नाही. प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न असले तरी त्यातील किती प्रश्न सोडवायचे, याची कोणतीही माहिती नसल्याने विद्यार्थी आपल्याला वाटेल तितके प्रश्न सोडवत पेपर बंद करत असल्याने अंतिम परीक्षांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार, यात शंकाच नाही. मात्र, त्या मुलांच्या भवितव्याचे काय?, असा सवाल यानिमित्ताने त्रस्त शिक्षकांनी करत यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. नेमके धोरण काय? बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहून परीक्षा देण्याचे बंधन आहे. मग त्यांच्याहून तीन ते चार वर्षांनी मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा ठेवण्या मागचे धोरण नेमके काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शनिवारचा गोंधळ शनिवारी सकाळी १०.३० वाजता असलेल्या ऑनलाइन परीक्षेची लिंक ओपन न झाल्याने ही परीक्षा आयत्या वेळी रद्द करून दुपारी ३.३०वाजता ठेवण्यात आली. ३.३० ते ६.३० या वेळेत ओपन असलेल्या लिंकमध्ये विद्यार्थ्यांना केव्हाही प्रश्नपत्रिका सोडविता येत असून विद्यार्थी परीक्षा देतो आहे, हे तपासण्याची कोणतीही सोय ठेवण्यात आलेली नसल्याचे विद्यार्थ्यांच्या चर्चेत समोर आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WzUTKM
via IFTTT

Post a Comment

0 Comments