मिनी मेडिकल कॉलेजे! शहरातील कॉलेजांवरील ताण कमी होणार

मुंबई : करोना काळामध्ये मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आणि त्या तुलनेत डॉक्टरांच्या अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सातत्याने भेडसावत होता. मात्र मुंबईतील आजारांचे स्वरूप व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिकेच्या सहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये नव्या वर्षात पदव्युत्तर प्रशिक्षण अभ्यासक्रमांची सुरुवात होत आहे. त्यासाठी ८० वैद्यकीय प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या मिनी मेडिकल कॉलेजांमुळे पालिकेच्या केईएम, लो. टिळक आणि नायर या मेडिकल कॉलेजांवर येणारा ताणही कमी होणार आहे. तसेच उपनगरीय रुग्णालयांतील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीही मदत होणार आहे. येथे अध्यापनासाठी येणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या गुणवत्तापूर्ण सेवेचा लाभ विद्यार्थ्यांसह रुग्णांनाही मिळणार आहे. 'एमबीबीएस'नंतर 'एमडी' वा 'एमएस'च्या धर्तीवर हा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पालिकेच्या वांद्रे व कुर्ला येथील के. बी. भाभा, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई, कांदिवलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोवंडी येथील मदनमोहन मालवीय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयामध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी औषध, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, पॅथॉलॉजी, त्वचारोग असे विविध विषय शिकवण्यासाठी वैद्यकीय शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. पहिली बॅच नव्या वर्षामध्ये सुरू होणार असून त्यादृष्टीने रुग्णालयांमधील वैद्यकीय नियोजनाचाही आढावा घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय विषयांच्या अभ्यासासाठी पदांची निर्मिती करण्यात आली आहे. औषध विषयासाठी ११, शस्त्रक्रियेसाठी १२, स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी १५, बालरोगतज्ज्ञ या पदासाठी ९, अस्थिव्यंगसाठी ८, रेडिओलॉजीसाठी पाच, कान-नाक-घसा या विभागासाठी ७, तर नेत्रविकारासाठी ७, भूलतज्ज्ञ ७, पॅथॉलॉजीसाठी ३, त्वचाविकार व संसर्गजन्य आजार या विषयांसाठी एक अशी पदांची रचना करण्यात आली आहे. प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रत्येक विभागाचे एक युनिट तयार करण्यात येणार असून त्यानुसार थिअरी, प्रॅक्टिकल आणि संशोधन या विषयावर भर देण्यात येणार आहे. पूर्णवेळ असलेल्या या अभ्यासक्रमासाठी पहिल्या व द्वितीय श्रेणीमधील प्रत्येकी ८६ पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. एमबीबीएस, एमडी किंवा डीएनबी पदवी प्राप्त झाल्यानंतर किमान आठ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव गरजेचा आहे. या नेमणुका कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहेत. दोन्ही श्रेणींमध्ये ५० आणि ५५ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. या आव्हानांचा विचार व्हावा उपनगरीय रुग्णालयांमधील वैद्यकीय गुणवत्तेच्या संदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित होतो. ती सुधारावी यासाठी स्पेशालिटी कन्सल्टन्टची पदे काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या. खासगी सेवेमध्ये मिळणाऱ्या वेतनश्रेणीच्या जवळपास जाणारी रक्कम देऊनही त्याला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता या अभ्यासक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या संशोधनासाठी उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुरेशी वैद्यकीय उपलब्धता नाही. त्यांचाही दर्जा वाढवणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VIRKHR
via IFTTT

Post a Comment

0 Comments