संवाद कौशल्याचा करा विकास

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर टीटीवायएल (ttyl), जीटीजी (gtg), एचआरयू (), रोस्टेड (roasted), आयडीके (), ड्राइव्ह मी (drive me), पीओएस (pos) ही केवळ अक्षरं नसून एक संपूर्ण अर्थपूर्ण वाक्य आहे. आश्चर्य वाटलं ना? पण, आजकाल शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी केवळ मित्रमंडळींसोबत नाही तर सगळीकडेच या भाषेचा वापर करतात. व्याकरण, वाक्यरचना, वाक्य निर्मिती यांची या पिढीस गैरसोय होते, असं म्हणायला हरकत नाही. हे झालं केवळ भाषेपुरतं. दुसरी त्रासदायक बाब म्हणजे वास्तविक संवाद साधणं. शिक्षण असो किंवा करमणूक स्मार्टफोन, संगणक हे तर अविभाज्य भाग बनले आहेत. तेव्हा या डिव्हाइसमध्ये स्वतःचे एक जग निर्माण केलेल्या गॅजेट पिढीस दुसऱ्यांसोबत वास्तविक संवाद साधणं आव्हानात्मक जाऊ शकतं. संवाद साधण्याचं महत्त्व माहीत नसल्यामुळे आजच्या तरुण पिढीचा घर आणि सामाजिक क्षेत्रातील संवाद हा मर्यादित झालेला आहे. एका क्लिकवर कोणतीही गोष्ट करणं किंवा गप्पा मारणं शक्य आहे तर मग वास्तविक संवादाची गरज काय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण, एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे 'काय बोलावं आणि कसं बोलावं?' हे माहीत नसल्यामुळे ही पिढी 'चर्चेची परिस्थिती' टाळत असू शकते. महाविद्यालयीन जीवनात जरी अडथळे आले नाहीत तरी कामाच्या ठिकाणी संवाद कौशल्यांच्या अभावामुळे कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. कॉर्पोरेट जग किंवा अगदी उच्च शिक्षण घेण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक आहे. ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत हे आजकाल बहुतांश महाविद्यालयांच्या निवड प्रक्रियेचा एक भाग असून, त्यात इतर कौशल्यांपेक्षा संवाद कौशल्यावर जास्ती भर दिला जातो. कॉर्पोरेट जगात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणजे मुलाखत आणि जर तिथे तुम्हाला संवाद साधता आला नाही तर तुमच्या निवडीची शक्यता फार कमी आहे. क्लाएंट, वरिष्ठ, ग्राहक, सहकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कामाच्या स्वरूपानुसार दुसऱ्यांशी संवाद कमी-अधिक प्रमाणात होऊ शकतो. पण, यामुळे संवादाचं महत्त्व कमी झालं असं नाही. तुमचं संवाद कौशल्य सुधारण्यासाठी काही टिप्स पुढे दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि रोजगारक्षम बनवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील. - स्वतःचं ज्ञान, वर्तमान घडामोडींबद्दल माहिती वाढवण्यासाठी विविध विषयांबद्दल वाचा. यामुळे शब्दसंग्रह तर वाढतोच. पण, त्याचप्रमाणे वाक्यरचना कशी करावी हे समजण्यास मदत होते. - सुरुवात घरच्यांपासून करा. तुमच्या कल्पना, विविध विषयांवरील मतं याबाबत घरच्यांसोबत चर्चा करा आणि मग हळूहळू शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. - मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग करण्यापेक्षा व्हिडीओ कॉल करा. हे सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीसाठी आहे. अन्यथा त्यांना समोरासमोर भेटा. समोरासमोर बोलण्यानं आपण किती सहजतेनं बोलू शकतो हे समजतंच. त्याचबरोबर श्रोत्याच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याची चांगली संधी मिळते. - केवळ स्वतःच्या आवडीच्या नाही तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. समजा दुसऱ्या विषयांबाबत जास्ती माहिती नसेल तर निराश होऊ नका, माहितीसंग्रह वाढवण्यासाठी उत्सुक व्हा! दुसऱ्यांकडून नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. - लोकांशी चर्चेत सामील व्हा. स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल. त्याचप्रमाणे योग्य शब्दांची निवड करून संवाद कसा साधावा हे देखील समजण्यास मदत होईल. - तुम्ही बोलायला उत्सुक आणि तयार आहात असे तुमच्या वागण्यातून दाखवून द्या. यामुळे दुसऱ्यांना तुमच्याशी बोलणं सोपं जाईल. - बोलताना नेहेमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोला. - संभाषण सुरु ठेवण्यासाठी त्या संबंधित प्रश्न विचारा. - सुरुवातीस संवाद साधणं हे जरी त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटलं तरीसुद्धा सहज हार मानू नका. सध्याचे जग हे वेगवान आहे आणि लोकांच्या आठवणी देखील अल्पकालीन आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांवर छाप पाडणं अपरिहार्य आहे आणि अशी छाप पाडण्यासाठी संवादासारखे प्रभावी कौशल्य कोणतं नाही. लक्षात घ्या, आपण लहान वयात बोलायला शिकतो. पण, संवाद साधणं हे एक कौशल्य असून हे कौशल्य विकसित होण्यासाठी बराच कालावधी लागतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3giX1zn
via IFTTT

Post a Comment

0 Comments